कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
होळीच्या दुसऱ्या दिवशी नाशिककर धुळवडीत दंग झाले होते. सायंकाळी होळीच्या भोवती वीर नाचविण्याची परंपरा असल्याने वीरांची मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात होळीभोवती वीर नाचविण्यात आले. विविध देवदेवतांच्या वेशात वीरांची घरातील देवांना स्नान घालण्यासाठी गोदाघाटाला जणू जत्रेचे स्वरूप आले होते. मिरवणूक आणि वीरांचे नृत्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती.
नाशिक जिल्ह्यात वीरांच्या मिरवणुकीचे महत्त्व असल्याने होळीच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांना देवदेवतांची वेशभूषा करून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी वीरांच्या टाकाची पूजा करण्यात आली. हे टाक खोबऱ्याच्या वाटीत घेऊन गावात मिरविण्यात आले. मिरवताना देवदेवतांची वेशभूषा करण्यात आली होती. जिथे होळी असेल तिथे प्रदक्षिणा मारून पुढे मिरवणूक जात होती. टाकांची मिरवणूक झाल्यावर टाकांना रामकुंडावर स्नान घालून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर घरी येऊन नैवेद्य दाखविण्यात आला.





Social Plugin