Ticker

6/recent/ticker-posts

मणदुरे जळव खिंडीजवळील उंच काऊदऱ्यावर मोंठ्या भक्तीभावाने निसर्गपुजा सोहळा संपन्न



 पाटण (दिनकर वाईकर )  

वनसंपत्तीचे जतन व संवर्धन करा तरच आपले जीवन सुखकारक होईल हा संदेश देत राज्यात सुख-शांती  यासाठी निसर्गाला जेजुरी खंडोबाचा भंडारा व जानाईदेवीचा गुलाल, नारळ अर्पण करून जेजुरीतील मार्तंड जानाईदेवीच्या हजारो भाविक- भक्तांसह मणदुरे, ता. पाटण येथील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जळव खिंडी जवळील उंच काऊदऱ्यावर रविवारी सकाळी निसर्गपूजेचा सोहळा साजरा केला.

             पर्यावरणाचा ऱ्हास, प्रचंड वृक्षतोड, जंगलतोड यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यातच प्रदूषण, खेड्यातून होणारे सिमेंटचे जाळे, परंपरा, संस्कार जपणाऱ्या खेड्यांचे वाढते आधुनिकीकरण यामुळे झालेली बेसुमार वृक्षतोड या कारणांनी शुध्द हवा मिळणेही अवघड झाले आहे. जिल्ह्यातील पाटण, तारळे, सातारा निसर्गप्रेमी आणि समस्त जेजुरीकर गावकऱ्यांनी आपली शेकडो वर्षाची धार्मिक यात्रा उत्सव पालखी सोहळ्याला पर्यावरण रक्षणाची जोड देवून जनजागृती करत वसुंधरा उत्सव साजरा केला जात आहे. आपल्या धार्मिक परंपरा व श्रध्देनुसार हजारो मित्र भाविक भक्तांनी सह्याद्रीच्या उंचकड्यावरून निसर्गाला नारळ गुलाल- भंडारा अर्पण करुन निसर्गपूजा साजरी केली.

                जेजुरीची ग्रामदैवता असलेल्या जानाईदेवीची पायी पालखी पद यात्रेचे जेजुरी येथून सात दिवसापूर्वी प्रस्थान झाले होते. ही पालखी आज पाटण खोऱ्यात काऊदऱ्यावर दाखल झाल्यानंतर जानाईदेवी अन्नदान पदयात्रा सेवा आणि जेजुरी ग्रामस्थ यांच्यावतीने मोठ्या भक्तीभावाने निसर्ग पूजेला हजारो लोक हजेरी लावतात. जेजुरी येथून धार्मिक विधीपूर्वक चांदीच्या रथासह पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या पारंपारिक बैलगाड्यांचा ताफा पूजेकरीता येत आसतो. सुमारे दीडशे किलोमीटरचा जयाद्री ते सह्याद्री असा प्रवास करत भाविक प्रथम निसर्गपूजेला काऊदरा येथे जातात व तद्‌नंतर मुक्कामी जानुबाई निवकणे येथे यात्रा काळात थांबतात. या निसर्गपूजेत येथील डोंगरवासी महिलांना साडीचोळी आणि वृक्ष देवून सन्मानित केले जाते. तर वसुंधरेला भंडारा उधळून हरितक्रांती व पर्जन्यवृष्टीकरीता प्रार्थना केली जाते. अशी माहिती मार्तंड जानाईदेवी पालखी सोहळा जेजुरी अन्नदान सेवा ट्रस्टमार्फत देण्यात आली. या निसर्ग पूजा सोहळ्यास जेजुरीसह पाटण तालुक्यातील निसर्गप्रेमींनी मोठ्यासंख्येने उपस्थिती दर्शवली