बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
भारतातील नद्या ह्या बहुतांशी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात परंतु नर्मदा ही एकच नदी अशी आहे की ती पश्चिमेकडे वाहते. नर्मदा म्हणजे शंकर पार्वती यांची कन्या आहे. नर्मदेच्या पवित्र स्नानाने पाप मुक्ती होते, तिच्या दर्शनाने मानवी दुःख हरण होते आणि तिच्या परिक्रमेमुळे माणूस पुण्य प्राप्ती होऊन स्वर्गप्राप्तीचा दावेदार होतो अशी आख्यायिका आहे. म्हणून माणसाने जीवनामध्ये एकदा तरी नर्मदा परिक्रमा पूर्ण करावी असे आवाहन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांनी केले. पुसेगाव येथील मंगेश संजयराव जाधव, शुभम यादव आणि संतोष शेडगे या युवकांनी मागील तीन महिन्यात तीन हजार सहाशे किलोमीटरचा पायी प्रवास करीत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. या निमित्ताने त्यांचा सत्कार देवस्थान ट्रस्टच्यावतीने व ग्रामस्थांचे तर्फे करण्यात आला.
सदर प्रसंगी देवस्थानचे चेअरमन रणधीर शेठ जाधव, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख ,गौरव जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना सुंदरगिरी महाराज पुढे म्हणाले, नर्मदा परिक्रमापूर्ण करण्यासाठी अनेक भक्त सहभागी होत असतात परंतु ही परिक्रमा खडतर व मेहनती पणाची आहे. पुसेगाव पंचक्रोशीमध्येही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी साक्षात नर्मदा नदीनेच या तिन्ही युवकांची निवड केल्याचे व्यक्त करून या पुण्यकर्माबद्दल त्यांचे कौतुक केले.
यावेळी मंगेश जाधव ,संतोष शेडगे आणि शुभम जाधव यांनी नर्मदा परिक्रमे बद्दलची सविस्तर माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. सदर प्रसंगी नर्मदा नदीच्या पवित्र जलाने श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीला मंत्रोच्चारात जलाभिषेक करण्यात आला. तत्पूर्वी नर्मदा कलशाची पुसेगाव नगरीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन सचिव विशाल माने तर आभार प्रदर्शन सुनील धोंगडे यांनी केले...





Social Plugin