कटगुण कुलभूमीत जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
महात्मा जोतीराव फुले यांनी भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विचार प्रवाहाला निर्णायक वळण देण्याचे काम केले. कर्मठ प्रथा-परंपरांना शरण गेलेल्या आपल्या समाजाला फुले यांनीच चिकित्सेचा विचार शिकवला. शिक्षण, धर्म , समाज, संस्कृती, शेती, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रांमध्ये अमुलाग्र परिवर्तनाचे महात्मा फुले यांनी केलेले कार्य भारतीयांना सर्वार्थाने आधुनिक करून गेले. समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी आजही महात्मा फुलेंचे विचार उपयुक्त असल्याचे प्रतिपादन युवा इतिहास अभ्यासक वक्ते प्रा. निरंजन फरांदे यांनी केले.
खटाव तालुक्यातील कटगुण या महात्मा फुले यांच्या कुलभूमीत १९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुशभाऊ गोरे, डॉ. प्रिया महेश शिंदे, भारती अंकुश गोरे, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त बाळासाहेब जाधव, भरत मुळे, प्रा. प्रल्हाद गायकवाड, पोलीस पाटील जयश्री गोरे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन किरण गायकवाड, संचालक सुमन गायकवाड, महात्मा फुले ट्रस्टचे सचिव सुधीर गोरे, किरण गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. फरांदे म्हणाले महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रारंभ करून हजारो वर्ष गुलामीचे जीवन जगणाऱ्या आत्मभान हरवलेल्या भारतीय स्त्री वर्गाच्या जीवनात क्रांती घडवली. जातीपातींची बंधने झुगारून त्यातील फोलपण दाखवून दिले. शेतकऱ्यांच्या दुःख आणि दैन्याची कारणे शोधकवृत्तीने तपासून त्यावर उपाय सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे पुनर्वाचन करून सामाजिक क्रांतीसाठी तो इतिहास नव्या जाणिवांसह समाजापुढे मांडला. मानवी जीवनात माजलेले पाखंड दूर करण्यासाठी त्यांनी निर्मिकाची संकल्पना मांडली. त्यांनी चार भिंतीत बसून केवळ तत्त्वचिंतन आणि पांडित्य केले नाही, प्रत्यक्ष तळागाळात उतरून कृतिशीलता दाखवली. त्यांच्या उदंड कार्यामुळे भारतीय समाजक्रांतीचे जनकत्व निर्विवादपणे महात्मा फुले यांच्याकडेच जाते. महात्मा फुले यांची विचारदृष्टी काळाच्याही पुढची असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रल्हाद गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन व आभार सुधीर गोरे यांनी मानले.





Social Plugin