शहापूर वार्ताहर रविंद्र धारवणे
शहापुरातील मुंबई नाशिक महामार्गावर लाहे फाट्यावर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या के. के. प्लास्टिक कंपनीला 19 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली असून महामार्ग परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. या कंपनीमध्ये प्लास्टिकचे दाणे बनवण्याचे उत्पादन घेतले जात असे. शहापूर तालुक्यात शासकीय अग्निशामक यंत्रणा नसल्याने भिवंडी येथून अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आले आहे. मात्र भिवंडी नगरपालिका निजामपूर येथून शहापूर तालुक्याचे अंतर लांब पल्यांचे असल्याने अग्निशामक यंत्रणेला घटनास्थळी पोहचण्यासाठी उशीर झाल्याने तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.
तालुक्यातील वासिंद जिंदाल कंपनीकडून अग्निशामक यंत्रणा पाठविण्यात आली होती.तसेच स्थानिकांकडून पाण्याच्या टँकर मागवून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र आगीच्या रौद्ररूपा पुढे हे प्रयत्न निष्पळ ठरले. आजूबाजूला असलेल्या इतर कंपन्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे. शासकीय आपत्ती व्यवस्थापन समितीची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली असुन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. कंपनी जळून खाक झाली असुन आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.के.के. प्लास्टिक कंपनीच्या बाजूलाच असलेल्या पीसीपीई कंपनी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी येण्याची दाट शक्यता आहे. घटनास्थळी भिवंडी येथील अग्निशामकच्या गाड्या उशिरा का होईना दाखल झाल्या असुन ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे शहापूर येथील चेरपोली ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळच्या सुमारास विजेचे ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली होती. शहापूर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये देखील सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र विजेचा ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला आहे. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ट्रांसफार्मरला आग लागली असल्याचा प्राथमिक कयास आहे.





Social Plugin