Ticker

6/recent/ticker-posts

तामकडे गावच्या हद्दीत अल्टोकार व आयशर ट्रकची धडक


पाटण, ( दिनकर वाईकर)  

कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गालगत तामकडे, ता. पाटण गावच्या हद्दीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जॅकवेलनजीक खेर्डीच्या (चिपळूण) दिशेने निघालेल्या अल्टोवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडीने विरूध्द दिशेला जावून कराडच्या दिशेने निघालेल्या आयशर माल वाहतूक ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात अल्टोमधील 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद सायंकाळी उशिरा पाटण पोलिसात दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  शुक्रवार दि. 19 रोजी पंढूरपूरहून कार्तिक वारी करून आपल्या खेर्डी (ता. चिपळूण) या गावी अल्टो गाडीतून (क्र. एम. एच. 08. ए. जी. 1165) परेश दत्तात्रय अघटराव (वय 52) हे आपल्या कुटुंबियांसमवेत निघाले होते. अल्टो कार कराड-चिपळूण राष्ट्रीय महार्गावरील पाटणपासून तीन किलोमीटर अंतरावरील तामकडे गावच्या हद्दीत आली असता सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अल्टोचालक परेश अघटराव यांच्या डोळ्यावर सुर्याची किरणे पडल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी विरूध्द बाजूला जावून चिपळूणवरून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या आयशर माल वाहतूक ट्रकला (क्र. एम. एच. 12 सी. टी. 5529) अल्टो गाडीने जोराची धडक दिली.

या अपघातात अल्टो गाडीतील चालक परेश अघटराव यांच्यासह  शामल परेश अघटराव (वय 42), रामचंद्र देवजी मुकनाक (वय 75), श्रीराम जयराम महाडीक (वय 78, काडोली, ता. चिपळूण), सुनीता मधुकर चाळके (वय 65, रा. लोटे, ता. चिपळूण) असे 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीकांनी त्यांना उपचारासाठी खाजगी गाडीने पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातील शामल अधवटराव व सुनीता चाळके या दोन महिलांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तर रामचंद्र मुकनाक व श्रीराम महाडीक यांच्या डोक्याला व छातीला मार लागला आहे. त्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघातातील आयशर ट्रकचालक नागेश माने (रा. कोल्हापूर) हे देखील किरकोळ जखमी आहेत. दरम्यान, खेर्डी येथीलच परेश अधटराव यांचे मित्र अभिजीत नालंग हे कोल्हापूरवरून खेर्डीकडे जात असताना अवधटराव यांच्या अपघाताची माहिती त्यांनी कुटुंबियांना दिली.

या अपघाताची माहिती समजताच पाटणचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर, सपोनि राजेंद्र सदगर, पोलीस हवालदार राजेंद्र पगडे, ए. एन. आढावे, एम. डी. लोंढे, व्ही. आर. पुजारी, संतोष कुचेकर, संतोष माने, वाहतूक हवालदार हणमंत नलवडे यांनी घटनास्थळी दाखल होवून अपघाताची पाहणी करत पंचनामा केला. त्याचबरोबर रस्त्यावरील अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या अपघाताची नोंदी सायंकाळी उशिरा पाटण पोलिसात दाखल करण्याचे काम सुरू होते. याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस करत आहेत.