Ticker

6/recent/ticker-posts

येडोबा यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे : अनंत गुरव


पाटण, (दिनकर वाईकर) 

श्री येडोबा देवाची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक विभागाने काळजीपूर्वक व जबाबदारीने काम करावे. ग्रामपंचायत व देवस्थान व्यवस्थापन समितीने भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शांततेत पार पडणाऱ्या यात्रेची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अनंत गुरव यांनी केले. येडोबा देवाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर बनपेठ-येराड, ता. पाटण येथे आयोजित केलेल्या नियोजन बैकठकीत ते बोलत होते. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदानंद साळुंखे, सरपंच आशाताई साळुंखे, भारती साळुंखे, उपसरपंच शंकर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तहसीलदार गुरव म्हणाले, येडोबा देवाची यात्रा मंगळवार दि. 23  पासून सुरू होत पाच दिवस यात्रा भरते. येडोबा देवाच्या यात्रेत इतर राज्यातील भाविकभक्त मोठ्या संख्येने येत असल्याने मोठी गर्दी असते. त्यामुळे सर्वच विभागांनी सतर्क राहून काम करावे. यात्रा शांततेत पार पाडण्याची यावर्षी परंपरा कायम रहावी आणि त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. यात्रेकरूंच्या सोयीसाठी ग्रामपंचायत व यात्रा समितीने पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा, पार्कीग, दुकान मांडणी, रहदारीस मुबलक जागा आदीचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस कर्मचारी पगडे म्हणाले, यात्रा काळात कायदा सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. यात्रेतील पाकीटमारी, दागिने चोरी व छबिन्यात होणारी हुल्लडबाजी याची दक्षता घेतली जाईल.

यात्रेकरूंच्या सोयीसाठी यात्रा नियोजनाची माहिती व देवस्थान समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा व स्थानिक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, पत्रकार यांचे संपर्क नंबर असलेली संपर्क वाहीनी तयार करण्यात येणार आहे. यात्रा काळात एसटी महामंडळाच्या जलद व अतिजलद बसेस येराडला थांबणार असून यात्रेकरूंसाठी पाटण, कराड, सांगली, पुणे, मुंबई आदी ठिकाणी जाण्यासाठी ज्यादा बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. अन्नभेसळ विभागाला प्रसाद, मिठाई व इतर खाद्यपदार्थ तपासणाच्या सूचना देण्यात येणार आहेत. यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व सासनकाठ्यांची उंची मर्यादित व येडोबा देवाच्या सासनकाठीपेक्षा कमी असावी, असे बैठकीत ठरवण्यात आले. वीज वितरण विभाग मंदीर व परिसराचे इलेक्ट्रिक ऑडीट करण्याचे ठरले. यात्रात काळात आरोग्य विभागाची दोन पथके रुग्णवाहिकेसह चोवीस तास सज्ज राहणार आहेत. तसेच पोलिसांच्या मदतीसाठी ग्रामस्थांचे किमान शंभर स्वयंसेवकाचे पथक तयार करण्यात येणार आहेत.

पी. पी. साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. हणमंत साळुंखे यांनी आभार मानले. बैठकीस प्रकाश साळुंखे, भरत पुजारी, राजेंद्र पुजारी, शामराव बालुगडे, राजाराम साळुंखे, नीलेश साळुंखे, भागवत साळुंखे, आनंदा साळुंखे, अशोक साळुंखे, पाटण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे. बी. दळवी, वीज वितरणचे सहाय्यक अभियंता डी. डी. लाड, पाटण आगार प्रमुख दयानंद पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही. बी. चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराज मोळावडे, डॉ. नागेश्वर ननावरे, आरोग्य निरीक्षक ए. एम. सपकाळ, मंडलाधिकारी ए. व्ही. घाडगे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ साळुंखे, तुकाराम साळुंखे, तलाठी पी. जी. शिंदे, पोलीस पाटील रविंद्र साळुंखे, गणेश जंगम, सुनिता बालुगडे ग्रामसेवक दीपक कोकणी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.