Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्यासाठी योगक्रांती , तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती : तहसीलदार चंद्रकांत शेळके


 जाणून घ्या योगा दिनाचा इतिहास जाणून घेताना आपल्या असे लक्षात येईल की 2014 मध्ये युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीच्या 69 व्या सत्रात भाषण देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव दिला होता . 11 डिसेंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिन प्रस्ताव 3 महिन्यांत बहुमताने स्वीकारण्यात आला आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. 2015 रोजी योग दिनाची सुरुवात झाली, त्यानंतर जगभरात दरवर्षी 21 जून रोजी   योग दिवस साजरा केला जातो . 

     योग ही आदि-अनादी काळापासून चालत आलेली भारतीय विद्या आहे . भारतवर्षातील ऋषीमुनी, संत, अध्यात्मिक गुरू यांनी आपल्यातील शक्तीचा विकास करून परम चैतन्य आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून पूर्ण आनंदाची प्राप्ती करण्यासाठी योगक्रियांचा उपयोग केला .  मानवाचे शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र आणणारी एक आध्यात्मिक प्रक्रिया. योग हा शब्द ‘युज’ या संस्कृत शब्दापासून बनला असून त्याचा अर्थ जोडणे असा होतो.

    महर्षी व्यास यांनीही योगाचा अर्थ समाधी असाच सांगितला आहे. समाधी म्हणजे समत्व  भावना , मनाची अविचल स्थिती , सम अशी बुद्धी म्हणजे समाधी असा मुलार्थ होतो .

       गुरुकूल शिक्षण पद्धतीपासून योग शिक्षणास प्रारंभ झाला असून ऋषींनी आपल्या शिष्यांना योगविद्या शिकविण्यास सुरुवात केली.

      योगशास्त्र हे अतिशय व्यापक शास्त्र आहे . मुलभूत विज्ञान, मानव्यविद्या यांतील विद्याशाखांमध्ये मानवी जीवनाच्या कोणत्याही एका अंगाचा अभ्यास करून अनेक अभ्यासशाखा व विषय निर्माण झाले . योगविज्ञानात मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा विचार करून व्यक्तिमत्त्वाचा परमोच्च विकास करणे , हे या शास्त्राचे उद्दिष्ट आहे . 

     कालानुरूप योगातील संकल्पना बदलत गेल्या. एका योगग्रंथातील प्रक्रिया दुसऱ्या योगग्रंथात वेगळ्या रूपात मांडण्यात आल्यात . उदा. स्वात्मरामांनी योगाची ४ अंगे सांगितली ; घेरण्डसंहितेमध्ये ७ अंगाचा उल्लेख आहे ; तर हठयोगात शुद्धीक्रिया आसने , बंध , प्राणायाम , ध्यान , कुंडलीनी जागृती , मुद्रा यांचे वर्णन आहे .

     जगात योगाचा प्रसार सर्वदूर करण्याचे कार्य महर्षी पतंजलीच्या अष्टांगयोगाने केले व पतंजली योगाला जगमान्यता मिळाली .

      आधुनिक काळात योग घराघरांत पोहोचला आहे . रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर , ऋषी प्रभाकर , विश्वास मंडलीक , प्रजपिता ब्रम्हाकुमारीज , स्वामी कुवलयानंद , मोरारजीभाई देसाई ,  योग संस्थान , दिल्ली अशा हजारो संस्था व तज्ज्ञ योगाचा प्रचार व प्रसार करीत आहेत . त्यामुळे योगाला सामान्य माणसाच्या हृदयात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे .

      अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात योग शिक्षणाची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे . योग शिक्षकांची अपुरी संख्या आणि वाढत्या लोकसंख्येमुळे व्यक्तिगत योग शिक्षण देणे अशक्य होऊ लागले आहे .

        योगमहर्षी पतंजलींनी आपल्या योगसूत्रात योगरूपी शरीराची आठ अंगे सांगितले आहे . यम , नियम , आसन व प्राणायाम ही ४ अंगे व्यक्तीच्या बाह्यरूपाशी निगडित असल्याने त्यांना बाह्यांगे असे म्हणतात ; तर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही अंतरंगे आहेत .

      भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार राजस्थान , गुजरात , हिमाचल प्रदेश , कर्नाटक , हरयाणा राज्य इत्यादी राज्यांमध्ये योग शिक्षण अनिवार्य केले आहे . राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने ( एनसीटीई ) तयार केलेल्या नवीन अध्यापक शिक्षण आराखड्यात अध्यापक शिक्षणाच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये योग शिक्षण विषयाचा समावेश करण्यात आला आहे .

       भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये सर्वच स्तरावर व्यायाम , खेळ , योगासने , योगिक क्रिया , प्राणायाम , सूर्यनमस्कार , विहार नियंत्रण , आयुर्वेद इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे . एन.सी.टी.ई. २०१४ नुसार शिक्षक प्रशिक्षणामध्ये योगशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे .

        आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या माध्यमातून भारतीय योग परंपरेचा प्रसार व प्रचार करण्याचे सुवर्णयुग सुरू झाले.

     योगा हे व्यक्तिमत्त्व विकासाचे अत्यंत प्रभावी शास्त्र आहे. योगीक क्रिया या व्यक्तिगत अनुभूतीचे शास्त्र आहे . योगाद्वारे शारीरिक , मानसिक व आत्मिक विकासातून व्यक्तीविकास होतो . समाज उभारणीसाठी , जीवन जगण्याची , विश्वशांती प्रस्थापित करण्यासाठी अष्टांग योग हा महत्त्वपूर्ण ठरतो . यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यांद्वारे व्यक्तीला आपल्या अस्तित्वाचा पूर्णबोध होऊन जीवनाचे अंतिम सत्य समजते व व्यक्ती अष्टावधानी बनते.