प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
तालुक्यातील चिंचगव्हाण गावातील दोन मित्र भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी, १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला होता. अपघात घडताच ट्रक चालक पसार झाला आहे. याप्रकरणी गुरूवारी, २० जून रोजी सकाळी १० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. विलास छगन बागुल (वय ४४) आणि अंकुश काशिनाथ गायकवाड (३५, चिंचगव्हाण) अशी मयत दोन्ही मित्रांची नावे आहेत.
विलास बागुल आणि अंकुश गायकवाड हे दोन्ही जीवलग मित्र चिंचगव्हाण गावात वास्तव्याला होते. १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोघे दुचाकीने (क्र.एम.एच.१५ डी.टी. ५७८८) चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथे कामानिमित्त जात असताना चाळीसगाव तालुक्यातील भोरस शिवारातील महामार्गावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र.एच.आर.६२ ए.१०८३) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील विलास बागुल आणि अंकुश गायकवाड हे दूरवर फेकले जाऊन त्यांना जबर मार बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी २० जून रोजी सकाळी १० वाजता मयत विलास बागुल यांचे चुलत भाऊ मुरलीधर बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार विजय शिंदे करीत आहेत.





Social Plugin