Ticker

6/recent/ticker-posts

अंबड तालुक्यात समाधानकारक पाऊसला सुरुवात ; पहिल्याच पावसात शेतकऱ्यांची धावपळ


जालना प्रतिनिधी/ज्ञानेश्वर साळुंके

अंबड :अंबड तालुक्यावर सध्या वरूणराजा मेहरबान असल्याचे चित्र दिसत आहे . 1 जून पासून 11 जून पर्यंत सतत आठ दिवसापासून अंबड तालुक्यात पाऊस होत आहे . सर्वाधिक पाऊस दहा तारखेला झाला . आतापर्यंत तालुक्यात सरासरी 122.2 इतका पाऊस झाल्याचे महसूल विभागाकडून कळविण्यात आले आहे . मागील वर्ष तीव्र दुष्काळाचे असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला होता . तथापि 4 जून पासून पाऊस कुठे ना कुठे हजेरी लावत आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे . लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे . अशाच प्रकारे पाऊस सतत पडत राहिला तर हंगाम चांगला होण्याची चिन्हे आहेत . अंबड तालुक्यातील जुन्या सात मंडळ निहाय पावसाचा विचार केला असता सर्वाधिक पाऊस गोंदी मंडळात 117. 7 मिलिमीटर इतका झालेला आहे , तर सर्वात कमी पाऊस रोहिलागड मंडळात 52.6 मिलिमीटर इतका झालेला दिसून येतो.

  तालुक्यात सर्वत्र पेरणीची लगबग सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे . अंबड तालुक्यात सध्या 60 गावात 81 टँकर सुरू असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले . तसेच श्री शेळके यांनी आवाहन केले आहे की पाऊस समाधानकारक असला तरी पावसाळी वातावरणात नद्या नाले ओढे यांना पूर येत असतो . अशा पुरातून धोकादायकरीत्या कोणीही जाऊ नये , तसेच गुरेढोरे सुद्धा घेऊन जाऊ नये . शेतात असताना विजा चमकत असल्यास सुरक्षित स्थळी थांबावे . स्वतःची व आपल्या गुरांची काळजी घ्यावी असेही त्यांनी आवाहन केलेले आहे . जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ , अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार , प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल , उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही शेळके यांनी यावेळी नमूद केले .