पाथर्डी प्रतिनिधी: ज्ञानेश कंठाळी
तालुक्यातील सुसरे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसाठी जिल्हा परिषद निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून ती 2020 मध्ये पूर्ण करण्यात आली.नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज इमारतीचे काम पूर्ण झाले असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी पुरेसा स्टाफ सदर साधनसामग्री उपलब्ध नसल्याने जवळपास या इमारतीला तीन वर्षाचा कालावधी लोटूनही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत धूळखात पडून असल्यामुळे इमारत परिसरात गवत पसरल्याचे चित्र आहे.
सुसरे परिसरात शेतकरी, शेतमजूर असल्यामुळे आरोग्याचा विचार केल्यास खाजगी दवाखान्यात उपचार घेणे परवडणारे नाही. गोरगरीब रुग्णांना तातडीची दर्जेदार वैद्यकिय सेवा मिळावी याकरिता प्रशासकीय मान्यतेसह निधीची उपलब्धता करुन देण्यात आली होती. मात्र सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून केवळ शोभेची वस्तू बनवली आहे अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. आरोग्य विभागाने तात्काळ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करुन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
सुसरे ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित सर्व कार्यालय व अधिकारी यांना पाठपुरावा करुन सुध्दा आरोग्य विभागातर्फे रुग्णालय सुरु करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणुन दिलेले आहे.रुग्णालय आजपर्यंत सुरुच करण्यात आले नाही. ही बाब चुकिची व अतिशय गंभीरस्वरुपाची असून संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. इमारत तीन वर्षांपासून धुळखात पडून असल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. प्रशासन याकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





Social Plugin