Ticker

6/recent/ticker-posts

भाविकांच्या सोयीसाठी साडे ५ कोटी रुपये खर्चून बांधलेले यात्री निवास पडले अडगळीत



ता.प्रतिनीधी ( निलेश जाधव माहुर )

माहूर (नांदेड) देवदेवतांचे दर्शन व साधूसंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची येथे सारखी वर्दळ असते. त्यांच्या सोयीसाठी शासनाने साडेपाच कोटी रुपये खर्चून इथे यात्री निवास बांधले. पुढे जमीन संपादन करतांना झालेल्या करारानुसार ही वास्तू श्री दत्तशिखर संस्थानला हस्तांतरित करण्यात आली. त्याला ३ वर्षाचा कालावधी उलटूनही ती वास्तू अद्याप सुरू झाली नसल्याने काही भाविकांना महागड्या लॉजचा तर गरीब भाविकांना मिळेल तिथे आसरा घ्यावा लागत आहे.

तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी दि. ६ डिसेंबर २०१२ रोजी संस्थानचे अध्यक्ष तथा प. पू. प. म. श्री मधुसूदनजी भारती महाराज यांना पत्र दिले होते. त्यानुसार पर्यटक मार्गदर्शक रूट कार्यालय, इम भारत, प्रदर्शन दालन, उपहारगृह, एटीएम, लॉकर रूम, स्वच्छतागृह, वाहनतळ, लहान दुकाने, सभामंडप, सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी गट नंबर ८५ म धील ५ हेक्टर व वाहनतळाच्या अॅप्रोच रोडसाठी गट नंबर ९८ मधील अंदाजे २००० चौ. मी.शेतजमीन विविध अटी, शर्ती व करारानुसार दीर्घ मुदतीच्या पट्ट्यावर शासनाला देण्यात आली. पुढे त्याजागी शासनाने सर्व सोयीयुक्त भव्य असे यात्री निवास बांधले. स मारे ८ वर्षाचा काळ लोटल्यावर २०२१ मध्ये तत्कालीन सन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी व संस्थानचे विश्वस्तात झालेल्या करारानुसार हे यात्री निवास संस्थान हस्तांतरित केले. त्याला ३ वर्षाचा कालावधी लोटला, परंतु अद्याप पर्यंत हे यात्री निवास भाविकांच्या सेवेसाठी खुले होऊ शकले नाही.

अनेक वर्षे सदरची इमारत बेवारस अवस्थेत होती. पर्यायाने अनेक किमती सामानाची पळवापळवी झाली. प्रांगणही झाडी झुडपाने वेढल्या गेले. वाहनतळ खुरट्या झुडपाच्या विळख्यात सापडले. एवढेच काय तर संस्थांची जमीन संपादित करतांना झालेल्या करारात पावित्र्य राखण्याला अनन्यसाधारण महत्व देण्यात आले होते. परंतु दिवसाढवळ्या त्या वास्तूत अनेक अनुचित प्रकार झाले.

या सर्व बाबी मात्र जिल्हा प्रशासन व संस्थान व्यवस्थापनासाठी निश्चितच लाजवणाऱ्या ठरल्या. संस्थांची जमीन दिर्घ मुदतीच्या पट्ट्यावर दिली. यात वाद नाही, परंतु सातबारावर जिल्हाधिकारी यांचे नाव चढले कसे? असा प्रश्न विश्वस्त गोपाल भारती यांनी उपस्थित केला आहे.

आगामी ३ महिन्यात यात्री निवास सुरू केले जाईल. तसेच यात्री निवास बांधलेली जमीन संस्थानच्या मालकीची असून सातबारावर चढलेले जिल्हाधिकारी यांचे नाव कमी करण्याबाबत प्रोसेस सुरू आहे. अशी माहिती संस्थानचे सचिव गणेश ठेंगे पाटील यांनी दिली