Ticker

6/recent/ticker-posts

एक ऑगस्ट पासून राबविणार महसूल सप्ताह : तहसीलदार चंद्रकांत शेळके



अंबड/ प्रतिनिधी (आकाश जळके) 

      महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूली कामे वेळच्यावेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे , वसूलीच्या नोटीसेस पाठविणे , मोजणी करणे , अपिल प्रकरणांची चौकशी करणे इ. केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता दरवर्षी दिनांक १ ऑगस्ट हा "महसूल दिन" म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

     जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविल्यानुसार महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत जिल्हातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा  तसेच , त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी , शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा , यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने १ ऑगस्ट या महसूल दिनापासून " महसूल सप्ताह " साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय  २५ जुलै, २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे .

      या महसूल सप्ताहामध्ये ,  प्रत्येक दिवशी समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी पुढीलप्रमाणे विशेष मोहिम / कार्यक्रम  /  उपक्रम  / शिबीरे /महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येणार आहे . 

  महसूल सप्ताहामध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा तपशील अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार यांनी कळविला आहे .

१ ऑगस्ट  :  महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ  करणे व मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण                             योजना  राबविणे 

२ ऑगस्ट :   मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविणे 

३ ऑगस्ट :  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविणे 

४ ऑगस्ट  :  स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय संकल्पना राबविणे 

५ ऑगस्ट   :  सैनिक हो तुमच्यासाठी संकल्पना राबविणे 

६ ऑगस्ट  :   एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा संकल्पना      राबविणे

७ ऑगस्ट :   महसूल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी  / कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी  /  कर्मचारी                     पुरस्कार वितरण करणे 


कार्यक्रमाचे सविस्तर स्वरूप निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कळविले 

१ ऑगस्ट रोजी  महसुल दिन साजरा करुन महसुल सप्ताहाचा शुभारंभ होणार असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  राबविण्यात येणार आहे . शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी , त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे , यासाठी  " मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण " योजना सुरु केली आहे .अर्जदारांना राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / राज्यातील जन्म दाखला , सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला , रेशनकार्ड, आधारकार्ड इ. कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे .  " मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण " योजनेचे अर्ज पोर्टल /मोबाईल ॲप / सेतू सुविधा केंद्रे येथून ऑनलाइन भरण्याची तरतूद करण्यात आली आहे . 

२ ऑगस्ट  रोजी  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे .  राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठीचा शासन निर्णय , कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने घेतला आहे . या योजनेचा लाभ अधिकाधिक युवकांना प्राप्त व्हावा , त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र , आधारकार्ड इ. आवश्यक असणारी कागदपत्रे त्यांना तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष शिबीरे आयोजित करण्यात यावीत असे निर्देश देण्यात आले आहेत . 

  ३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यात येणार आहे . सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत , त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची / दर्शनाची संधी उपलब्ध करुन दिली आहे .  या योजनेच्या लाभासाठी अर्जदारांना राज्याचे अधिवास प्रमाणपत्र  / राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला , रेशनकार्ड , आधारकार्ड इ. कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत . सदर योजनेचा लाभ अधिकाधिक ज्येष्ठ नारिकांना प्राप्त व्हावा ,  त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे त्यांना तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत .

  ४ ऑगस्ट  रोजी  स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय  संकल्पना राबविण्यात येणार आहे . विशेष मोहिम राबवून जिल्हास्तरावरील , तालुकास्तरावरील , मंडळ स्तरावरील व ग्रामस्तरावरील कार्यालयांची व परिसराची साफसफाई करावी , कार्यालयाचे अभिलेख व दस्तऐवज यांचे वर्गीकरण व व्यवस्थापन , निंदणीकरण व महत्वाच्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग व संगणकीकरण करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी , असे शासन निर्णयात नमूद आहे . 

  ५ ऑगस्ट  हा दिवस " सैनिक हो तुमच्यासाठी " म्हणून राबविण्यात येणार आहे .  राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी , सैनिक यांना व त्यांच्या कुंटुंबियांना आवश्यक असणारे , महसूल कार्यालयांकडून निर्गमित होणारे विविध दाखले / प्रमाणपत्रे मिळणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अर्जावर कार्यवाही करण्यात  येणार आहे . तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचा-यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार आहे .  संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी /कर्मचारी यांना घरासाठी / शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येणार आहेत .

   ६ ऑगस्ट  हा दिवस  " एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा " म्हणून राबविण्यात येणार आहे .  या दिवशी राज्याच्या दिव्यांग व्यक्तींकरीता शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध योजना / उपक्रमांबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . अनाथ मुले - मुली म्हणजे आई - वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय / निमशासकीय / शासन अनुदानित अनाथ आश्रमात न राहणारे मुले-मुली यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने अनाथ असल्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने विशेष मोहिम राबविण्यात  येणार आहे .  या अनाथ मुलांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळण्याच्या अनुषंगाने या क्षेत्रात काम करणा-या सामाजिक संस्थांची आवश्यकतेनुसार मदत घेण्यात येणार आहे . 

 ७ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी संवाद ,  उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण करुन महसुल सप्ताहाची सांगता होणार आहे .  या दिवशी उत्कृष्ट काम करणा-या अपर जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी, तहसिलदार , नायब तहसीलदार , अव्वल कारकून , मंडळ अधिकारी , महसूल सहाय्यक , तलाठी , पोलीस पाटील व कोतवाल यांचा उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी म्हणून गौरव सन्मान करण्यात येणार आहे . 

    अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांनी या कालावधीत स्वतः व तहसिलदार यांनी व्यक्तीशः संबंधितांच्या अडचणी समजून घेऊन त्या निकाली काढण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येईल , असे म्हटले आहे . 

        या सप्ताहात नागरिकांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्यात येऊन नागरिकांची कामे सुकर करण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी तत्पर असतील असा विश्वास अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दर्शविला आहे .


.