बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] .
जय हनुमान श्रावणी पायी दिंडी सोहळयाचे बुध येथून पंढरपूरकडे आज दि .१० रोजी सकाळी ९वाजता प्रस्थान झाले . ग्रामस्थांनी येथील गावाच्या वेशीवर विठूनामाच्या जयघोषात निरोप दिला . यावर्षी दिंडीचे १४ वे वर्ष आहे . बुध येथील कैवल्य सम्राट चक्रवर्ती पारायण मंडळ व ग्रामस्थांतर्फ जय हनुमान श्रावणी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले . सकाळी ८ .३० वाजता बुध बाजारपेठेतील श्री . हनुमान मंदिरामध्ये ह.भ.प. बाजीराव रणसिंग महाराज व ह .भ.प. विठ्ठल खाशाबा सुर्यवंशी यांच्या हस्ते वीणापूजन करण्यात आले .
यावेळी बबनराव पाटणकर , जिल्हा नियोजन समितिचे सदस्य व उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , दिंडीचालक जनार्दन बागवडे , दिंडी अध्यक्ष हरीभाऊ त्रिपुटे , , सचिव नितीन खोत , चोपदार प्रकाश बागेकरी, हरिभाऊ खोत ,रामचंद्र सातपुते, राजू दरेकर , आप्पा खटके , यश मांजरे , नाना भिसे , सदानंद खटके , गिरणार जगताप , राहुल कदम , अधिक जगदाळे , अनिल जंगम , अनिल जगदाळे , सुनिल गायकवाड , व पुसेगाव , नेर ,रणसिंगवाडी , राजापूर, पांगरखेल , काटेवाडी , डिस्कळ अनपटवाडी , शिंदेवाडी , मोळ , धावडदरे,गादेवाडी येथील वारकरी संप्रदायातील ग्रामस्थ व बुध येथील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या . श्री हनुमान मंदिरापासून दिंडीला सुरुवात झाल्यानंतर गावातून महिलांनी ठिकठिकाणी वारकऱ्यांचे . स्वागत केले .स्टॅण्ड परिसरात दिंडी आली असता भाविकांनी , ग्रामस्थांनी , मनोभावे दर्शन घेतले .
'ज्ञानोबा -तुकाराम ' च्या जयघोषात , अभंगाच्या तालावर वारकरी भक्तीरसात न्हाऊन गेले . देहभान विसरून सर्व वारकरी विठूनामाचा गजर करीत नाचत होते . यावेळी महिला व पुरुषांनी फुगडया खेळल्या . भक्तिमय वातावरणात उपस्थितांनी ठेका धरला . कपाळी वैष्णवाचा टिळा , बुक्का , हातात टाळ , वीणामृदंग आणि मुखावरचा भक्तिभाव . अशा वातावरणात दिंडी सुरु झाली . ह.भ.प. विवेकानंद वासकर महाराजांच्या प्रेरणेतून ही दिंडी सुरू केली आहे . दिंडी बुध येथून निघून बिदाल , म्हसवड , तांदूळवाडी असा प्रवास करीत पंढरपूर येथे दाखल होईल . चंद्रभागा स्नान व देवदर्शन झाल्यानंतर बारशीच्या जेवणानंतर दिंडी परतीचा प्रवास सुरू होईल .





Social Plugin