कोयना नदीपत्रात प्रतिसेकंद ५२,१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. धरणात ८६.६३ टीएमसी पाणीसाठा. पाणीसाठ्यात किंचितशी घट.
पाटण ( दिनकर वाईकर )
हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट दिल्यानंतरही कोयना धरणांतर्गत विभागात त्यापटीत पाऊस झाला नाही. धरणातून याच दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यानंतर त्या पटीत आवक कमी झाल्याने सध्या धरणातील मूळ पाणीसाठ्यात काहीशी घट झाली आहे. धरणात सध्या अपेक्षित व तुलनात्मक जादा पाणीसाठा उपलब्ध आहे. अद्यापही धरणाचे सहा वक्री दरवाजे साडेदहा फुटांवरच स्थिर आहेत. कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ५२,१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणात प्रतिसेकंद ४५,८७० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर सर्वच परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून छोट्या नद्या, नाले, ओढ्यांमधून प्रतिसेकंद सरासरी ४५,८७० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणाचे दरवाजे साडेदहा फूटांवर स्थिर ठेवण्यात आले असून यातून ५० हजार तर पायथा वीजगृहातील २० मेगॅवॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे ४० मेगॅवॅट वीजनिर्मिती करून २,१०० असे प्रतिसेकंद ५२,१०० क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
धरणाच्या एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी आता ८६.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे १८.४७ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
धरणात सध्या ८६.६३ टीएमसी उपलब्ध तर ८१.५१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून मागील चोवीस तासात धरण पाणीसाठ्यात ०.१५ टीएमसीने तर पाणी उंचीत २ इंच घट झाली आहे. शुक्रवार संध्याकाळी पाच ते शनिवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात कोयना ८५ मिलिमीटर, नवजा ५७ मिलिमीटर, तर महाबळेश्वर १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने कोयना नदीच्या पाणी पातळीतील वाढ अद्यापही कायम असल्याने नदीकाठची गावं ,लोकवस्त्यांना देण्यात आलेला सावधानतेचा इशारा अद्यापही कायम ठेवण्यात आला आहे.





Social Plugin