Ticker

6/recent/ticker-posts

फळपिकांना मातीद्वारे खते देण्याचं प्रात्यक्षिक



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

खटाव तालुक्यातील राजापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदुतानी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२०२५ कार्यक्रमाअंतर्गत फळपिकांना मातीद्वारे खते देण्याचे प्रात्यक्षिक घेतले व शेतकऱ्याना मार्गदर्शन केले.हे प्रात्यक्षिक  सुरज घनवट यांच्या आंबा बागेमध्ये करून दाखवण्यात आले. कृषीदुतानी सुरुवातीला या प्रात्यक्षिकास लागणारी खते जसे की, युरिया (नत्र), सिंगल सुपर फॉस्फेट (स्फुरद), म्यूरेट ऑफ पोटॅश(पालाश) यातील रासायनिक घटक यांची माहिती शेतकऱ्यांना दिली. त्यांनी ही खते पिकाला देण्याची शास्त्रीय पद्धत शेतकऱ्यांना सविस्तररित्या सांगितली. या रसायनासोबत त्यांनी शेणखताचाही वापर केला. यांनी आंबा फलोत्पादनासाठी लागणारा एन. पी. के. (२०० ग्राम नत्र, २०० ग्राम स्फुरद, ३०० ग्राम पालाश +१० किलो शेणखत) प्रती झाड प्रती वर्ष (एक वर्ष वयाच्या झाडांसाठी) हा डोस ही शेतकऱ्यांना सांगितला. तसेच ही खते वापरण्याचे फायदे जसे की, नत्र हे पानातील हरितद्रव्यांचा महत्त्वाचा घटक असून ते झाडाच्या प्रकाश संश्लेषणासाठी उपयुक्त ठरते. तसेच स्फुरद हे मुळांचे चांगल्या वाढीसाठी व पालाश हे फळाची निरोगी वाढ, फळाचा आकार व दर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त आहे, हे शेतकऱ्यांना पटवून दिले.

या उपक्रमास शेतकऱ्यांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, तसेच प्रा. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत अथर्व देवकर , यश निकम , रोहन बारबोले ,पुष्कर बिसेन , सत्यजित धायगुडे , सुयोग भोसले , व साहिल भोसले यांनी हा उपक्रम पार पडला.