धरणात ८६.३४ टीएमसी पाणीसाठा. पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद २,१०० क्युसेक्स विसर्ग.
पाटण ( दिनकर वाईकर )
कोयना धरणांतर्गत विभागात पावसाने उघडीप दिल्याने धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, ओढे, नाल्यांमधून प्रतिसेकंद केवळ १७,२७० क्युसेक्स इतक्याच पाण्याची आवक होत आहे. पाण्याची आवक घटल्यानंतर धरणाची उर्वरित साठवण क्षमता लक्षात घेऊन मंगळवारी सकाळी धरणाच्या दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २,१०० क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहेत. कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने त्यांतर्गत विभागातील ठप्प दळणवळण आता पूर्ववत झाले आहे.
धरणाच्या एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी आता ८६.३४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे १८.९१ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
धरणात सध्या ८६.३४ टीएमसी उपलब्ध तर ८१.२२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून मागील चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात ०.२३ टीएमसीने व पाणी उंची ३ इंचाने वाढ झाली आहे. सोमवार संध्याकाळी पाच ते मंगळवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात कोयना ३४ मिलिमीटर, नवजा ८७ मिलिमीटर, तर महाबळेश्वर १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.





Social Plugin