Ticker

6/recent/ticker-posts

बोधेगाव पोलीस स्टेशनचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे धूळखात :- नितीनराव काकडे



पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या  आश्वासनाने नितीनराव काकडे यांचे धरणे आंदोलन मागे...!

शेवगाव --  किशोर चव्हाण

         शेवगाव तालुक्याच्या बोधेगांवसह परिसरात चोरट्यांची दहशत कायम असून, गेल्या १५ दिवसापासून या भागातील वाडया-वस्त्यांवर चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच आहे. मागे काही दिवसापू्वीच येथील आघाव वस्तीवर दरोडेखोरांच्या मारहाणीत पती, पत्नी गंभीर जखमी झाले आहेत ते अजुनही दवाखाण्यात उपचार घेत असून संपूर्ण आघाव कुटुंब भयभीत आहे. गमे वस्ती, ढाकणे वस्ती यासह या भागातील आदी वाडीवस्ती तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक बी. रामानंद असतांना मुरमीला दरोडा पडला होता, दरोडेखोरांनी महिलेला चाकूने भोकसून गंभीर जखमी केले होते. या सर्व घटनेचा तपास लावण्यास पोलीसांना आजपर्यंत अपयश आले आहे. या घटनेपासुन परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी भयभित झाले आहेत. या परिसरात रात्रीचे ड्रोन फिरत आहेत, नागरिक रात्र जागुन काढतात. चोरटयांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करून बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे. तसेच गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून बोधेगावला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव त्यावेळच्या पोलीस अधिक्षकांनी नाशिक विभागीय परिक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षकांना सादर केला होता. त्यांनी प्रस्ताव राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठवला होता, पोलीस महासंचालकांनी बोधेगांवला स्वतंत्र पोलीस ठाणे मंजुरीसाठी राज्याच्या गृह मंत्रालयालयाकडे पाठवला तेव्हा पासुन हा प्रस्ताव मंत्रालयात धुळखात पडला आहे. बोधेगाव नंतर जिल्ह्यातील बेलवंडी, सोनई, घारगाव यासह आदी पोलीस ठाण्याचे प्रस्ताव मार्गी लागले आहेत. परंतु बोधेगाव पोलीस स्टेशनचा प्रस्ताव अद्यापही मार्गी लागला नाही याला केवळ तालुक्याचे आजी-माजी लोकप्रतिनिधी कारणीभूत असून यांच्या नाकर्तेपणामुळेच बोधेगाव पोलीस स्टेशनचा प्रस्ताव अद्यापही धूळ खात पडून असल्याचे प्रतिपादन बोधेगाव जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनराव काकडे यांनी केले.

             शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पोलीस स्टेशनच्या मालकीची जागा असून देखील अद्यापही या ठिकाणी पोलीस स्टेशन झाले नाही. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे. बोधेगाव व लाडजळगाव गटामध्ये तसेच आदी परिसरात रात्रीची गस्त घालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवावी. बोधेगाव येथील पोलीस दूरक्षेत्रावर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, शाळा, कॉलेज परिसरात फिरणाऱ्या रोड रोमियांचा बंदोबस्त करावा, रात्रीचे वेळी फिरणाऱ्या ड्रोनचा खुलासा करावा, बोधेगाव परिसरात घडलेल्या चोरी, दरोडा यासह आदी घडलेल्या घटनेचा तपास लावून कार्यवाही करावी, बाजार पेठेतील व्यापारी व व्यावसायिकांना चोरट्यापासून त्रास मुक्त करावे, ट्रॅफिक पोलीसांची देखील नियुक्ती करावी यासह आदी मागण्यासाठी बोधेगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली बोधेगाव येथील ग्रामस्थांनी पोलीस दूरक्षेत्रासमोर बुधवार दि. २८ रोजी धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. परंतु शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे सदरील पुकारलेले धरणे आंदोलन हे मागे घेण्यात आले. तसेच आम्ही केलेल्या सर्व मागण्या पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास बोधेगाव सह परिसरातील चाळीस गावातील ग्रामस्थ सोबत घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी भव्य जन आंदोलन करणार असल्याचे देखील यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनराव काकडे यांनी सांगितले.

          यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बोधेगावचे उपसरपंच नितीनराव काकडे, भाजपचे उपाध्यक्ष कासमभाई शेख, बालमटाकळीचे उपसरपंच सर्जेराव घोरपडे, ज्येष्ठ नेते मुसाभाई शेख, रज्जाकभाई बेग, भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती-जमाततीचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान मिसाळ, जावेदभाई पठाण, ग्रामपंचायत सदस्य युनूसभाई पटेल, बोधेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन महादेव घोरतळे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद गायकवाड, गोकुळ घोरतळे, ग्रामपंचायत सदस्य महेश घोरतळे, गुलामहुसेन सय्यद, बाबाभाई पठाण, शाहुराव खंडागळे, संभाजी घोरपडे, लियाकत शेख, समीर बागवान, राजू बागवान, गणेश आधापुरे, भारत घोरपडे, शारुख शेख, विजय कानडे, संजय पोटभरे यांच्यासह बोधेगाव पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ससाणे, पोलीस नाईक ईश्वर गर्जे, गुप्तवार्ता विभगाचे बाबासाहेब गरड, पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर यांच्यासह शेतकरी, व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.