Ticker

6/recent/ticker-posts

शहाजीराजे हेच शिवरायांचे महागुरू - विश्वास पाटील;



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

  गनिमी काव्याच्या युद्धतंत्राची दीक्षा महागुरू शहाजी महाराजांनीच आपले पुत्र शिवरायांना दिली होती. इतकंच नाही, तर शिवरायांची प्रसिद्ध राजमुद्राही संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित असलेल्या शहाजीराजांनी स्वतः लिहिली होती. शहाजीराजे हेच शिवरायांचे महागुरू होते; पण शिवरायांसारख्या सामर्थ्यवान पुरुषाला घडविणाऱ्या त्या महान पित्याकडे महाराष्ट्राने मात्र साफ दुर्लक्ष केल्याची खंत प्रसिद्ध इतिहासकार, कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.         

 पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री सेवागिरी व्याख्यानमालेत 'छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनतंत्र' या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, ट्रस्टचे माजी पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, "विधात्याने औरंगजेबासारख्या पाप्याला ८९ वर्षांचे आयुष्य दिले. मात्र शिवरायांना . केवळ १८ हजार ३०६ दिवसांचे आयुष्य दिले.परमेश्वराने आपल्या  भूमीवर अन्यायच केला . मात्र  अवघ्या ४९ वर्षांच्या या आयुष्यातही  चार-चारशे शतके पुरेल इतका महापराक्रम त्यांनी केला . आणखी  दहा वर्षांचे जरी आयुष्य मिळाले असते, तरी छत्रपती शिवरायांनी भीमा, नीराकाठची घोडी, इंग्लंडच्या नदीकाठी नाचवली असती."

श्री. पाटील यांनी युगपुरुष छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा आणि जाज्वल्य इतिहास विविध प्रसंग व संदर्भासह आपल्या खास शैलीत उलगडला. छत्रपती शिवाजी महाराज निसर्गपुत्र होते, असे सांगत पाटील म्हणाले, "त्यांना नदी, डोंगर, वाटा- पायवाटा यांची माहिती होती. याचा त्यांनी स्वराज्य उभारणीत उपयोग केला."

     मालवणच्या घटनेबद्दल खंत...

■ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रत्येकाच्या हृदय मंदिरात राहूद्या, राजकारणाच्या स्वार्थासाठी त्यांना कृपा करून मतदान केंद्रावर उभे करू नका, असे सांगून मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेबद्दल श्री. पाटील यांनी खंत व्यक्त केली.