Ticker

6/recent/ticker-posts

*महात्मा फुलेंच्या अखंडाची छेडछाड- समता विरोधी ब्राम्हणवादी मानसिकतेचे प्रतिबिंब!



तातडीने दुरुस्ती करण्याची भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

नाशिक ,प्रतिनिधी ,अमन शेख,

नाशिकच्या मुंबई नाक्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला, ज्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. हा पुतळा उभारण्यामागे महान क्रांतिकारी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या आणि समाजसुधारणेच्या कार्याची आठवण जपण्याचा उद्देश असावा, अशी अपेक्षा होती. मात्र, पुतळ्याच्या मागे म्हणजेच मुख्य मुंबई नाका चौकात मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेल्या महात्मा फुलेंच्या ‘विद्येविना मती गेली’ या प्रसिद्ध अखंडातील एका महत्त्वपूर्ण ओळीची छेडछाड करून आरएसएसच्या विचारधारेच्या महायुती सरकारने जातीयवादी प्रवृत्तीचं आणखी एक दर्शन घडवलं आहे. आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या कृत्याचे तीव्र निषेध करतो.


"विद्येविना मती गेली,  

मतीविना नीती गेली,  

नीतीविना गती गेली,  

गतीविना वित्त गेले,  

वित्ताविना शूद्र खचले,  

इतके अनर्थ एका अविद्येने केले."

हा महात्मा फुलेंचा अखंड पूर्वाश्रमीच्या शूद्रांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे स्पष्टपणे वर्णन करते. फुलेंनी त्यांच्या अखंडात 'वित्ताविना शूद्र खचले' या ओळीतून समाजातील जातीय विषमतेमुळे शूद्र वर्गाचे शिक्षण, संपत्ती आणि सामाजिक उन्नती कशी रोखली गेली, हे ठळकपणे मांडले आहे. या ओळीमध्ये शूद्र म्हणजेच बहुजन समाज जातीमुळे नाकारलेल्या शिक्षणामुळे आणि संपत्तीच्या कमतरतेमुळे कसे सामाजिकदृष्ट्या मागे पडले आहेत, हे फुले अधोरेखित करतात.

परंतु, नव्या पुतळ्याच्या मागे असलेल्या अखंडातून ‘वित्ताविना शूद्र खचले’ ही महत्त्वपूर्ण ओळ मुद्दामहून वगळली गेली आहे. 'जातिविना वित्त खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.' असा बदल त्यात करण्यात आलेला आहे. हे केवळ शब्दांचे गाळणे नसून, फुले यांच्या अखंडाच्या मूळ अर्थालाच छेद देण्याचा प्रयत्न आहे. महात्मा फुले यांनी जातीय अत्याचारांच्या विरोधात लढा दिला, शूद्र-अतिशूद्र आणि स्त्रियांना शिक्षण देऊन सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. मात्र, आजच्या सरकारने त्यांच्या या मूळ विचारालाच धक्का देत ही ओळ वगळणे म्हणजे ब्राह्मणवादी मानसिकता दाखवण्याचा एक प्रकार आहे.

या कृत्यामागे महायूतीच्या सरकारची जातीयवादी प्रवृत्ती स्पष्टपणे दिसून येते. शूद्र आणि बहुजनांच्या ऐतिहासिक दुखण्यांवर उपचार करण्याऐवजी त्यांच्या वेदना आणि संघर्ष इतिहासातून पुसण्याचा प्रयत्न होत आहे. महात्मा फुले यांच्या या अखंडाचा उद्देश केवळ शैक्षणिक स्थितीवर भाष्य करणे नव्हता तर त्यातून समाजातील जातीय विषमतेला आणि आर्थिक असमानतेला वाचा फोडणे हाच होता.

छगन भुजबळ, ज्यांनी या पुतळ्याच्या बांधणीचं नेतृत्व केलं, ते स्वतः राष्ट्रीय पातळीवर ओबीसी नेते म्हणून मिरवून घेता, महात्मा फुलेंची जणू त्यांनी एकट्यानेच मक्तेदारी घेतलेली आहे असे दर्शवता. त्यांनी या चुकीकडे दुर्लक्ष केले किंबहुना मुद्दामून स्वतःचे संघाच्या विचाराशी असणारे समर्पण अधोरेखित करण्यासाठी हे केले असावे जे अत्यंत खेदजनक आहे. भुजबळांचा आरएसएसच्या विचारधारेकडे झुकाव आणि महात्मा फुले व भारतीय संविधानात असलेले समता ऐवजी संघाला अभिप्रेत असलेल्या समरसतेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न, यामुळे त्यांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह अजून स्पष्ट करते. समरसतानुसार जातीय विषमतेकडे दुर्लक्ष करून ब्राह्मणी जात व्यवस्थेने ज्याला जो स्थान दिला आहे, त्याने त्या स्थानावर समाधानी राहून जाती जाती मध्ये संघर्ष न करता जातीय सलोखा कायम ठेवावा असा संदेश दिला जातो. तथाकथित खालच्या जातींनी त्यांच्यावर होणाऱ्या शोषणाविरुद्ध बंड पुकारून जाती निर्मूलन करून व जातीची उतरंड तोडून समता आधारित समाजाची स्थापना करण्यासाठी संघर्ष करण्याचे स्वप्न सुद्धा बघू नये असा संघाचा मत आहे. समरसताची संकल्पना ही आपल्या महामानवांनी दिलेल्या समता या मुल्याला छेद देणारी आहे. तथाकथित उच्च प्रस्थापित जात-वर्गातील पुरुषांच्या हितसंबंधांचे रक्षण करणारी आहे.


या घटनेविरोधात समाजातील शोषित जात वर्गाने व स्त्रियांनी आवाज उठवला पाहिजे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या कार्याचा व विचारांचा आदर करायचा असेल, तर त्यांची विचारधारा जसाच्या तशी समाजासमोर ठेवली गेली पाहिजे. हा अखंड केवळ शब्दसंग्रह नाही, तर सामाजिक वास्तवाचं प्रतिबिंब आहे आणि या प्रतिबिंबाला अशा प्रकारे विद्रुप करणे म्हणजे बहुजन समाजावर पुन्हा एकदा अन्याय करणेच आहे.


सरकारने एका आठवड्याच्या आत तातडीने यात योग्य ती दुरुस्ती करावी आणि महात्मा फुले व सावित्रीबाईंच्या विचारांना सन्मानपूर्वक स्थान द्यावे अशी आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मागणी करतो. हीच त्यांच्या कार्याला व त्यांच्या विचारांना आदरांजली ठरेल.