शेख अमिरपाशा
माहूर तालुक्यातील टाकली गावातील शेतकरी नर्सिंग मुंडे यांच्या शेतात सोयाबीनची हार्वेस्टिंग चालू असताना अचानक एक मोठा साप दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. त्वरित नर्सिंग मुंडे यांनी MH 29 हेल्पिंग हॅण्ड वाईल्ड ऍडवेंचर अँड नेचर क्लब, यवतमाळ शाखा, माहूरगडच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. नांदेड जिल्हाध्यक्ष मोहन मुर्खे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने रेस्क्यू टीम पाठवली.
रेस्क्यू टीममध्ये सर्पमित्र भीमाशंकर सूर्यवंशी, राजू मुरखें, आणि विकास ठाकर यांचा समावेश होता. त्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, अंदाजे 10 फूट लांबीचा भारतीय अजगर (इंडियन रॉक पायथन) सोयाबीनच्या शेतात आढळला. अजगराच्या उपस्थितीमुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांना सर्पमित्रांनी अजगराबाबत योग्य माहिती देऊन त्यांची भीती दूर केली.
रेस्क्यू टीमने अत्यंत कौशल्याने अजगराला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना याची माहिती दिली. वनपाल माने सर आणि राठोडसर तसेच वनरक्षक निशांत सर हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अजगराचा पंचनामा करून त्याला माहूरच्या प्रादेशिक जंगलात सोडले.
गेल्या दोन महिन्यांत या सर्पमित्रांनी 3 अजगरांना सुरक्षितपणे पकडून वनविभागाच्या सहकार्याने निसर्गात सोडले आहे. जर कुठेही जखमी वन्यजीव किंवा साप आढळल्यास, MH 29 हेल्पिंग हॅन्ड्स वाईल्ड ऍडवेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ हेल्पलाइन नंबर 9850577616 किंवा नांदेड जिल्हा हेल्पलाईन क्रमांक शाखा माहूर 9922363538 वर संपर्क साधावा. पशुपक्षांची जेव्हा होईल रक्षा, पर्यावरणाची होईल तेव्हाच सुरक्षा.





Social Plugin