रायपूर प्रतिनिधी मोहम्मद रफिक
राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲन्ड ज्यु. क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भट रायपूर येथील 3 विद्यार्थ्यांनी विभागीय शालेय वुशू स्पर्धेत चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. या विजयामुळे त्यांची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 05/06 ऑक्टोबर वार शनिवार व रविवार रोजी अमरावती येथे शालेय विभागीय वुशू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपूर चे जिल्हास्तरावर विजेते 3 मुली व 3 मुले असे एकुण 6 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. यात 17 वर्षे वयोगटात व 40 किलो वजन गटात कु. प्रिती एकनाथ सास्ते हिने विजय मिळवला तर मुलांमध्ये 17 वर्षे वयोगटात आदित्य जिवन सिरसाट व प्रणव अंबादास देशमाने यांनी अनुक्रमे 40 व 45 वजन गटात विभागीय स्पर्धेत प्रतीस्पर्धी स्पर्धकांना नमवत विजय मिळवला. या विजयामुळे तिन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर सई मनोहर सिरसाट, आचल मंगलसिंग धनावत व आदित्य धोंडू खंडागळे यांना द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.
विजेते स्पर्धकांना शुभेच्छा देत असतांना संस्था अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके म्हणाले कि, या दमदार कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान आहे. साधारणपणे क्रीडा स्पर्धांमध्ये शहरी खेळाडूंचा बोलबाला बघायला मिळतो. ग्रामीण खेळाडू काहीसे मागे पडलेले दिसतात. मात्र मला सांगायला आनंद होतो की, ग्रामीण भागात असूनही जिजाऊ ज्ञान मंदिर स्पोर्ट्स हब म्हणून ओळखले जाते. संस्थेने खेळ पुरक वातावरण, पुरेशा सोयीसुविधा, तज्ञ प्रशिक्षक उपलब्ध केले आहेत. याचा लाभ घेऊन आमचे खेळाडू नैसर्गिक क्षमतेच्या जोरावर कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत. गतवर्षी तायक्वांडो, कराटे, युनिफाईट खेळ प्रकारात आठ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली होती. यामध्ये एकास रजत पदक मिळाले होते. तर जवळपास ५४ खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. शाळेने दोनवेळा राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्ण पदक सुद्धा मिळवलेले आहे हे विशेष. गुणी खेळाडूंना राज्यस्तरावर सुद्धा यश मिळो यासाठी खूप खूप शुभेच्छा.*या यशासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक भूषण सिरसाट यांनी मेहनत घेतली. तसेच शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





Social Plugin