Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे.....प्रा.डॉ.संजय क्षीरसागर



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाचे आवड निर्माण करून वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डॉ.संजय क्षीरसागर  यांनी केले. पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग यांच्या विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' आयोजित केला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी .भोसले होते. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. संजय क्षीरसागर होते. व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.के.जी .कुंभार,प्रा.एच.जी. निमसे,प्रा.डाॅ.एन.डी. लोखंडे, प्रा.एम.एन.आवळे इत्यादी उपस्थित होते. डॉ. क्षीरसागर आपल्या भाषणात पुढे म्हणाले,"देशाच्या युवा पिढीला डॉ .ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या विचारांनी आणि  कर्तृत्वाने भारावून टाकले होते. 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी १५ ऑक्टोबर रोजी शाळा, महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून दिवसातील एक तास तरी वाचन केले पाहिजे, वाचनामुळे महान व्यक्तींच्या आयुष्यात चांगले संस्कार घडत असतात याबाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी .भोसले म्हणाले,'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे विविध संदर्भ ग्रंथ, महान व्यक्तींच्या चरित्र ग्रंथाचे वाचन विद्यार्थ्यांनी करून आपल्या ज्ञानात सातत्याने भर घातली पाहिजे याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केलेले होते याचे उद्घाटन श्री सेवागिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अशोक सावंत यांच्या हस्ते झाले. प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी प्रकट वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के.जी. कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एम. एन. आवळे यांनी केले. आभार प्रा. एस. आर. धोंगडे यांनी मानले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.