Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी लढण्याची गरज - डॉ. श्रीरंजन आवटे



बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]  

भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हा आत्मा आहे. त्याच्या रक्षणासाठी लढण्याची गरज आहे, असे मत संविधानाचे अभ्यासक, साहित्यिक  डॉ.श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले.

     भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पाठक हॉलमध्ये आयोजित केलेल्या ३८ व्या थोरांच्या स्मृती 'संविधान जागर' व्याख्यानमालेत 'मूलभूत हक्क व संविधान' या विषयावर ते बोलत होते .अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते. विचार मंचावर उपाध्यक्ष रमेश इंजे ,कार्यवाह ॲड. हौसेराव धुमाळ, कोषाध्यक्ष केशवराव कदम उपस्थित होते.

     डॉ. श्रीरंजन आवटे म्हणाले, भारतीय संविधान या देशाचे जीपीएस म्हणजे स्वप्न नकाशा व  आम्ही भारतीय लोकांचा सामूहिक संकल्प आहे. संविधानाचा आशय जपण्या ऐवजी संविधानाचे मंदिर बांधून किंवा  माथ्याला लावून संविधान टिकणार नाही. संविधानाच्या अमृत महोत्सवात असे विपरीत घडत आहे. संविधानाला चूड लावण्याचे  व्यापक षडयंत्र चालू आहे. मूलभूत हक्कांची पायमल्ली करण्यात येत आहे.

घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली सामाजिक, आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. सामाजिक न्यायाचा विचका होत आहे .विषमतेची विषवल्ली  वाढत आहे. आरक्षणाचा हक्क हा सामाजिक न्यायचा मुद्दा आहे .गरिबी हटवण्याचा तो कार्यक्रम नाही. मूलभूत हक्कातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क अतिशय महत्त्वाचा आहे तो प्राणपणाने जपला पाहिजे. संविधानाचा मूलभूत ढाचा बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही.तसा  प्रयत्न कितीही झाला तरी तो यशस्वी होणार नाही. मानवी जगण्याला प्रतिष्ठा देणारे मूलभूत हक्क लढण्याची प्रेरणा देतात. अल्पसंख्यांकांचे हक्क विचारपूर्वक मूलभूत हक्कांमध्ये निर्धारित करण्यात आलेले आहेत. त्याला चूड लावण्याचे काम जाणीवपूर्वक करण्यात येत आहे.त्याची पायमल्ली होता कामा नये. 

     संविधानाची उद्देशिका आदर्श शपथपत्र आहे.ते भावी पिढ्यांसाठी   परंपरेचा, प्रेमाचा हा वारसा सर्वस्व पणाला लावून जपला पाहिजे. मूलभूत हक्कांची पायमल्ली सर्रासपणेआज सुरू आहे. त्याच्या रक्षणा करिता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे,असे डॉ.श्रीरंजन आवटे यांनी सांगितले.

     ॲड. हौसेराव धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. केशवराव कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संबोधी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध कॉलेजचे प्राध्यापक,विविध  क्षेत्रातील मान्यवर सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.