बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीची लगबग सर्वत्र सुरू झाली आहे. कांदा पीक हे नगदी असले तरी दराबाबत बेभरोसा असे याची ओळख आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने कांद्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असायचा. आता बदलत्या काळात शेतकऱ्यांचा कांदा बी पेरणीकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. कमी वेळात व कमी पैशात पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांचा याकडे अधिक कल आहे.
यंदा पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शिवाय शेतीमध्ये आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीचेही दर वाढत्या महागाईमुळे वाढले आहेत. त्यामुळे कमी वेळ व कमी खर्चामध्ये अधिकची कामे कशी होतील, यावर शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. कांदा लागवडीच्या पारंपरिक प्रक्रियेने सुरुवातीला शेतजमिनीची मशागत करावी लागते.
त्यानंतर सारे ओढून त्यामध्ये बि टाकून त्याची रोपे तयार केली जातात. लागवडीनंतर दीड महिन्याने हे रोप लागवडीयोग्य होते. यासाठीशेतकऱ्याचा वेळ आणि पैसाही खर्च होत आहे. रोप लागवडीनंतर चार महिन्यांनी कांदा काढण्यायोग्य होतो ,परंतु ट्रॅक्टरच्या साह्याने कांद्याची पेरणी करण्याने शेतकऱ्याला वेळेची बचत करून कमी खर्चात कांदा होत असल्याने शेतकऱ्यांचा पेरणीकडे वाढता कल दिसून येत आहे . तसेच पेरलेला कांदा हाही चार ते पाच महिन्यांमध्ये काढणीयोग्य होतो .बी पेरून रोप तयार करणे हा सर्व खर्च ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केली तर टाळू शकतो, तसेच मनुष्यबळही कमी लागते आणि वेळेची बचत होत असल्याने कांदा बी पेरणीवर अधिक आहे.
कांद्याची पेरणीमुळे लागवडीसाठी मजुरांवर ज्यादाचा होणारा खर्च, तसेच बियाणांचीही बचत होते. रोप तयार करून कांदा लागणीला मजुरांकडून लावून घेताना एकरी दहा ,हजार रुपये अशी रक्कम कांदा लागवड करणाऱ्या मजुरांना द्यावी लागते; परंतु याउलट ट्रॅक्टरच्या साह्याने कांदा पेरणी केली तर एकरी ३o०० रुपये खर्च येतो. त्यामुळे आर्थिक बजेट आणि वेळेची बचत होत आहे. --राजेंद्र काळोखे, शेतकरी, बुध





Social Plugin