बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सैनिकांची परंपरा असणाऱ्या फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी (ढवळ) गावचे सुपुत्र जवान शेखर दिलीप जगदाळे हे सीमा सुरक्षा दल (बी. एस. एफ.) मधून 30 नोव्हेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शेरीचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दुर्दम्य इच्छाशक्ती व मेहनतीच्या जोरावर शेखर जगदाळे हे सन 2004 साली बीएसएफ मध्ये भरती झाले होते. वीस वर्षांच्या यशस्वी सेवेनंतर नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतली.
जवान शेखर यांनी इंदोर येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढे रायगंज, सोनारी, महाराणीचेरा, गोकुळनगर, अखनूर, मुंबई, गोगोलॅन्ड या ठिकाणी अत्यंत निष्ठेने सेवा बजावली आहे. काश्मीर येथील सीमेवर अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असतानाही देशाप्रती आदरभाव व निष्ठा बाळगत त्यांनी केलेल्या कार्याचा आणि सन 2019 ते 2024 या पाच वर्षांच्या कालावधीत डेपोटेशनवर ई. डी. कार्यालय मुंबई या ठिकाणी असताना अत्यंत प्रामाणिक, निपक्ष व संवेदनशील वृत्तीने त्यांनी केलेल्या कामाचा अभिमान असल्याने जवान शेखर यांचा गौरव करीत असल्याचे यावेळी ग्रामस्थ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
सुमारे 1000 लोकवस्ती असलेल्या शेरीचीवाडी गावात 35 हुन अधिक आजी - माजी सैनिक आहेत. गावातील एक जवान शहीद नवनाथ ढेंबरे हे सन 2003 मध्ये काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. त्यामुळे नव्याने सैन्यदलात भरती होणाऱ्या सैनिकांचा सत्कार आणि सेवा पूर्ण करून आलेल्या सैनिकांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करून देशसेवा करणाऱ्या गावच्या सुपुत्रांच्याप्रति कृतज्ञता म्हणून असे गौरव सोहळे या गावात केले जातात. याच पार्श्वभूमीवर जवान शेखर जगदाळे यांची घोड्यावरून भव्य मिरवणूकही काढण्यात आली होती.
यावेळी गावातील सर्व आजी-माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब मोहिते यांनी केले. वीज वितरण अधिकारी अनिल शिंदे, सीआरपीएफ मधील असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर दत्तात्रय मोहिते, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मोहिते, माजी सरपंच केशवराव मोहिते, माजी उपसरपंच दिनकरराव चव्हाण, ह. भ. प. नानासो मोहिते, सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी अरुणराव चव्हाण, हंबीरराव मोहिते यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास फलटण दूध संघाचे माजी संचालक श्रीरंग चव्हाण, माजी सरपंच किसनराव शिंदे, गावच्या सरपंच दुर्गादेवी नलवडे, सोसायटीचे चेअरमन अंकुशराव डांगे, माजी चेअरमन विकास मोहिते, पोलीस पाटील दयानंद चव्हाण, माजी सैनिक सोमनाथ चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्येष्ठ नागरिक अंकुशराव मोहिते, सचिन शिंदे, हनुमंत मोहिते, शरद शिंदे, संजय ढेंबरे, आण्णा मोहिते तसेच विकास सेवा सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, झडकबाईवाडीचे सरपंच तानाजी मुळीक, पोलीस अधिकारी भीमराव पवार आदींनी जवान शेखर यांचा सत्कार संपन्न केला. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या वतीनेही जवान शेखर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मंडळे यांची लक्षणीय उपस्थिती होती. सत्कारमूर्ती शेखर जगदाळे यांनी आपल्या मनोगतातून गावाने केलेल्या गौरवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित चव्हाण यांनी केले तर आभार सुषमा मोहिते यांनी मानले.




Social Plugin