अंबड/प्रतिनिधी मयुर वाव्हळ
आपल्या घरी तिर्थपुरी येथे जाण्याकरीता अंबड- मंगरुळ बसमध्ये चढत असलेल्या एका जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ३५ हजाराची सोन्याची पोत गर्दीचा फायदा घेवून चोरट्याने तोडून चोरून नेल्याची घटना आज बुधवारी (ता.१८) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अंबड बसस्थानकात घडली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, तिर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील कुसुम लक्ष्मण बोबडे (वय ६० वर्ष) या काल मंगळवारी (ता. १७) तिर्थपुरी येथून अंबड शहरातील नुतन वसाहतमध्ये राहत असलेल्या त्यांच्या मुलाला गणेश लक्ष्मण बोबडे यास भेटण्याकरीता अंबड येथे आल्या होत्या.
दरम्यान, आज बुधवारी (ता. १८) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्या तिर्थपुरी येथे त्यांच्या घरी परत जाण्याकरीता अंबड येथील बसस्थानकात अंबड ते मंगरुळ या बसमध्ये चढत असतांना जास्त गर्दी असल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किंमतीची ज्यात दोन सोन्याचे डोरले व ६४ सोन्याचे मनी अशी ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तोडुन चोरून नेली.
सदर घटना त्यांचा मुलगा गणेश बोबडे यांनी पो- लीस निरीक्षक सतिष जाधव यांना कळवली असता त्यांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना बसस्थानकात पाठवले. यावेळी पोलिसांनी संबंधित बसमधील सर्व प्रवाशांची झडती घेण्यासह बसमध्येही बारकाईने पाहणी केली मात्र पोत तसेच चोरटा काही सापडला नाही.या प्रकरणी कुसुम बोबडे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष घाणे हे करीत आहेत.





Social Plugin