रॉयल करिअर अकॅडमी ललगुण येथे उत्कृष्ट नियोजनात स्पर्धा संपन्न.
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीप्रित्यर्थ सातारा जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी बालक्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर केंद्रस्तर, बीटस्तर, तालुकास्तरावरून जिल्हास्तरासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यावर्षी दिवाळीच्या सुट्टीपूर्वी खटाव तालुक्यातील सर्व केंद्रस्तराच्या स्पर्धा पूर्ण झाल्या असून सध्या तालुकास्तरावरील निवडीसाठी बीटस्तरीय स्पर्धा चालू आहेत.
मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी बुध बीटाअंतर्गत येणाऱ्या वर्धनगड, राजापूर, ललगुण येथील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा रॉयल करिअर अकॅडमी ललगुण या ठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडल्या. स्पर्धेत सहभागी तीनही केंद्रातील स्पर्धकांनी अतिउत्कृष्टरित्या खेळांचे प्रदर्शन केले.
वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात जिल्हा परिषद केंद्रशाळा राजापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पारितोषिके मिळवल्याने रॉयल करिअर अकॅडमी यांचेमार्फत या शाळेस जनरल चॅम्पियनशिप प्रदान करण्यात आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसाठी बुध बीटातील अधिकारी व शिक्षकांमार्फत प्रशस्तीपत्र तर रॉयल करिअर अकॅडमी मार्फत मेडल्स व सन्मानचिन्हे वितरित करण्यात आली.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष दीपक शिरतोडे म्हणाले की, ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हायचे असतील तर बालवयातच मुलांसाठी क्रीडात्मक व्यासपीठ मिळायला हवे. म्हणूनच या शासकीय स्पर्धांसाठी मागील काही वर्षापासून अकॅडमीमार्फत सुसज्ज मैदान, अनुभवी परीक्षक, आवश्यक क्रीडासाहित्य, यशस्वी विद्यार्थ्यांसाठी पारितोषिके देण्याचे काम केले जात आहे.
स्पर्धेचे नियोजन केंद्रप्रमुख श्री. नितीन खोत, अजित निकाळजे, नवनाथ गावडे यांनी अत्यंत सूत्रबद्ध रीतीने केले होते. यानुसार सर्व शिक्षक व अकॅडमीतील विद्यार्थी यांनी सर्व स्पर्धा निपक्षपणे व उत्साहात पार पाडल्या.
यावेळी विविध गावचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य पालक वर्ग व क्रीडाप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धेत गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते व शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण स्पर्धेचे समालोचन केंद्रप्रमुख नितीन खोत यांनी केले, सूत्रसंचालन विनोद गोडसे यांनी तर आभार संतोष पाटणे सर यांनी मानले.





Social Plugin