Ticker

6/recent/ticker-posts

कारवर गोळीबार करणाऱ्यांचा पोलिसांकडून कसून शोध अवैध पिस्तूल प्रकरणातील संशयितास दोन दिवसांची कोठडी..



अंबड / वडीगोद्री : प्रतिनिधी मयूर वाव्हळ 

अंबड तालुक्यातील शहागड येथे शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बीड कडून सोलापूर - धुळे महामार्गावरुन जाणाऱ्या कार (क्र.एम एच.१२. टी. डी ००९९) ही छत्रपती संभाजीनगर कडे जात असताना गेवराईहून राक्षसभूवन फाटा दरम्यान या कारवर अज्ञात तीन दुचाकीस्वारांनी पाठलाग करुन कार चालक तात्या सोनवणे (३०) याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या बरगडीत लागल्याने कारचालक गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर कार उलटली. दरम्यान, कार मालक बाळासाहेब भगवान म्हस्के याच्याजवळ अवैध पिस्तूल सापडल्याने गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितास सोमवारी (दि.१६) न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंबड तालुक्यातील शहागड येथे शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास धावत्या कारवर तीन दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याचा थरार घडला. या घटनेत कार चालक तात्या सोनवणे गंभीर जखमी झाला. या प्रकरणी तात्या सोनवणे यांचे वडील प्रकाश सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन तीन अज्ञात लोंकाविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर घटनास्थळी शहागड, गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर व जालना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. गंभीर जखमी झालेल्या कार चालक तात्या सोनवणे यास उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. बीड जिल्ह्यातील हत्या प्रकरण गाजत असतानाच याच जिल्ह्यातून आलेल्या कारवर गोळीबार होण्याची घटना घडल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, गोळीबारीच्या घटनेनंतर उलटलेल्या कारमध्ये विना परवाना पिस्टल सापडले. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस कर्मचारी अक्रूर रामदास धांडगे यांच्या फिर्यादीनंतर कार मालक बाळासाहेब भगवान म्हस्के (रा.रेवकी-देवकी, ता. गेवराई जि. बीड) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती गोंदी ठाण्याचे सहायक निरीक्षक आशिष खांडेकर यांनी दिली.