विविध जातींचे श्वान पाहण्याची पर्वणी; 'चॅम्पियन ऑफ शो'चा सन्मान
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
येथील श्री सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त जातिवंत श्वानांचे प्रदर्शन दोन जानेवारीला सकाळी ११ वाजता आयोजित केले आहे. विविध जातींचे श्वान या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहायला मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील श्वानप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे.
विविध जातीच्या श्वानांची माहिती हौशी लोकांपर्यंत पोचावी, यासाठी आयोजित केलेले यंदाचे श्वान प्रदर्शन यात्रा स्थळावरील कृषी व पशुपक्षी प्रदर्शन मंडपात होणार आहे. स्पर्धेसाठी श्वानाच्या जातीनुसार गट पाडले जातील. प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक काढले जातील. प्रत्येक बक्षीसपात्र श्वानाच्या मालकाला सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट दिले जाईल. 'चॅम्पियन ऑफ शो' म्हणून एका श्वानाची निवड करून त्याचा विशेष सन्मान केला जाईल.
स्पर्धेसाठी प्रवेश निशुल्क असेल. प्रदर्शनस्थळी श्वानांच्या काळजीसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. नावनोंदणीसाठी तसेच अधिक माहितीसाठी ट्रस्ट कार्यालय व खटाव तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी.पी. लोखंडे यांच्याशी संपर्क साधावा. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने विशेष परिश्रम घेत आहेत. चौकट : श्वानांच्या सर्वोत्कृष्ट प्रजाती त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह या प्रदर्शनात पाहण्यास मिळतील. शेतकरी, श्वानप्रेमी, लहान मुले, तरुणांसाठी हे प्रदर्शन पर्वणी असेल. - डॉ. सुरेश जाधव, अध्यक्ष, सेवागिरी देवस्थान ट्रस्ट





Social Plugin