अंबड.प्रतिनिधी मयूर वाव्हळ
पं. राजा काळे यांनी गायिलेल्या स्वानंदी, जयतीर्थ मेऊंडी यांच्या दरबारी कानडा, मिश्रा बंधूंच्या राग जोगकंस, मंजुषा पाटील यांच्या राग नंद आणि पं. विश्वनाथ दाशरथे यांच्या राग चंद्रकंस आणि भैरवीने शतकोत्तर दत्त जयंती संगीतोत्सवाची शानदार सांगता झाली.शतकोत्तर श्री दत्त जयंती संगीतोत्सवात पाचव्या आणि समारोपाच्या सत्रात रविवारी 'विश्वनाट्य सूत्रधार तूच शामसुंदरा ' या नांदीने करण्यात आली. पं. विश्वनाथ दाशरथे आणि त्यांच्या श्रीराम संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ही नांदी सादर केली. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील विक्रांत वायकोस यांच्या कलाश्री अकादमीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भरतनाट्यमने उपस्थितांची मने जिंकली. गणेश कौतुक, शब्दम, वर्णन, मधुरा अष्टकम आदी भरतनाट्यमचे प्रकार त्यांनी सादर केले. शब्दम प्रकारात भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळी उचलला ते नृत्य अभिनयाद्वारे सादर केले. रागम रागमालिकेतील संत तुकाराम महाराजांनी रचलेला 'बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभावे 'हा अभंग सादर करून तयार झालेल्या भक्तीमय वातावरणात रसिक श्रोते तल्लीन झाले होते.
लता मंगेशकर यांच्या आवाजातील 'वंदे मातरम् 'या देशभक्तीपरील गीत नृत्यअभिनयाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या शतकोत्तर दत्त जयंती संगीतोत्सवाच्या नियोजनात गेले वर्षभर सक्रिय कार्यकर्त्यांचा यावेळी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दत्त जयंती संगीतोत्सव हा जसा भनंग जळगाव येथून अंबड येथे आणून पुढे चालू ठेवला गेला तसाच तो पुढेही अखंडितपणे चालू राहावा यासाठी अधिक मोठ्या ठिकाणी आयोजित केला जावा आणि म्हणूनच तो आगामी काळात छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करावा अशी सूचना संयोजन समितीच्या अविनाश थिगळे यांनी केली, या सूचनेचे उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. यावर योग्य वेळी योग्य तो विचार करावा असे ठरवण्यात आले. शेवटी प्रथेप्रमाणे स्व. गायनाचार्य गोविंदराव जळगावकर यांनी गायिलेल्या 'अवघेचि त्रैलोक्य आनंदची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेविले' ही ध्वनीमुद्रित फीत लावून हा ऐतिहासिक दत्त जयंती संगीतोत्सव संपन्न झाला. पहाट झालेली असतांना देखील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपाली कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर आणि महेश वाघमारे यांनी केले.





Social Plugin