Ticker

6/recent/ticker-posts

परभणी घटनेच्या निषेधार्थ दिग्रस मध्ये मोर्चा



( गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला )


 राजपाल बनसोड  प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचे विटंबना झाल्यानंतर आता संविधान प्रेमी व आंबेडकर अनुयायात संतापाची लाट उसळली आहे. सोमनाथ सूर्यवंशी व विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याने दिग्रस मध्ये दिनांक 18 डिसेंबर रोजी विशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर खुनाचे खटले दाखल करून त्यांना निलंबित करावे, भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, भारतीय संविधानाची विटंबना कुठेच होऊ नये या करिता कायदा असावा, अशा मागण्याही मोर्चेकर्‍यांनी केल्या आहे. दिग्रस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून दुपारी बारा वाजता आंबेडकर अनुयायांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अर्पण करून मोर्चा काढला. शहरातील मुख्य मार्गावरून निघालेले या मोर्चात गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. तहसीलवर हा मोर्चा धडकल्यानंतर यावेळी मागण्यांचे निवेदन दिग्रस चे तहसीलदार मयूर राऊत यांच्यामार्फत राष्ट्रपतीसह महाराष्ट्राच्या राज्यपालांना पाठविण्यात आले. 

यावेळी गौतम तूपसुंदरे, अजिंक्य मात्रे, सय्यद अक्रम, नूर मोहम्मद खान, अमृत मासुळकर, स्वाती जमदाडे, अमोल मनवर, पुंडलिक इंगोले, एड. नितीन कुबडे यांनी आपल्या भाषणातून परभणी घटनेचा निषेध केला. धर्मराज गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी एसडीपीओ चिलुमुला रजनीकांत, ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यवतमाळतील दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात होते. मोर्चामध्ये हजारो आंबेडकर अनुयायी तथा ग्रामीण भागातील महिला मंडळ सहभागी होत्या. ( दिग्रस करांचा कडकडीत बंद - दिग्र शहरात आज बंदची हाक पुकारली होती त्यामुळे गावातील सर्व प्रतिष्ठाने स्वयंपूर्णतेने बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दर्शविला होता. उभाटा शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचा, कार्यकर्त्यांचा या मोर्चाला पाठिंबा होता. समस्त संविधान प्रेमी तथा आंबेडकर अनुयायांनी मोर्चाला हजेरी लावली होती.)