(एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाल्याने गावासह परिसरात हळहळ)
संदिप गावडे @ प्रतिनिधी
पेठ-सांगली रस्त्यावर मिरजवाडी ता. वाळवा येथे रस्ता ओलांडताना चारचाकीने दिलेल्या धडकेत कु. समिक्षा दिपक पाटील (वय १७) रा. मिरजवाडी ही युवती गंभीर जखमी झाली होती. तिचा गुरुवारी रात्री साडेदहा वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. समिक्षा हि येथील ग्रामपंचायत सदस्य दिपक पाटील यांची एकुलती एक कन्या होती. तिच्या अपघाती निधनाने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने मिरजवाडी-कारंदवाडीसह परिसरावर शोककळा पसरली आहे .
मिरजवाडी येथे पेठ - सांगली रस्त्यावर हॉटेल विराज समोर समीक्षा पाटील ही रस्ता ओलांडत असताना सांगलीच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या रंगाच्या हुंडाई क्रेटा (क्रमांक एम. एच. १० डी. ई ४२०५ ) या चारचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात ही समीक्षा पाटील गंभीर जखमी झाली व वाहनाचेही नुकसान झाले. आष्ट्याहून भरधाव वेगाने गाडी चालवून धडक दिल्याने चारचाकी चालक राजकुमार सुकुमार कवटगी ( वय ४२) रा. विद्यानगर, मिरज याच्याविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहे.
या अपघातात समिक्षा हिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिला उपचारासाठी सांगली तसेच कोल्हापूर येथील डॉ. प्रभू यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण समिक्षावर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तिचे निधन झाले.
समिक्षा ही सांगली येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. समिक्षा पाटील दांपत्याची एकुलती एक मुलगी होती. पण नियतीने अपघाताच्या रूपाने तिच्यावर घाला घातला. तिच्या अकाली आणि अपघाती निधनाने पाटील कुटुंबियाला मोठा धक्का बसला आहे.





Social Plugin