Ticker

6/recent/ticker-posts

तिघे मित्र मुंबई पोलीस दलात दाखल



 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

घरची जेमतेम स्थिती, आई- वडिलांचे अपार कष्ट, अशा प्रतिकूल परिस्थितीवर श्री सेवागिरी महाराज अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मदतीने जिद्दीने मात करणारे पुसेगावच्या एकाच गल्लीतील तिघे मित्र मुंबई पोलीस दलात दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी आजतागायत कष्ट करणाऱ्या पालकांचे व सेवागिरी अभ्यासिकेचे परिसरात कौतुक होत आहे.

सरावासाठी घरी हव्या त्या सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र, याची तमा न बाळगता या तिघांनी पोलीस होण्याचे स्वप्न पाहिले. त्याला त्यांचे परिश्रम, कठोर सराव आणि सेवागिरी  अभ्यासिकेचे पाठबळ मिळाले. पवणकुमार संजय चव्हाण, विजय मारुती कराडे, मारुमुत्ती आलगर कुडुंबर अशी पोलीस दलात निवड झालेल्या तिघा मित्रांची नावे आहेत.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व गरीब कुटुंबातील गरजू मुलांना सनदी अधिकारी होण्याची संधी मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या येथील डी. एन. जाधव फाऊंडेशन संचालित श्री सेवागिरी महाराज अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्रात या तिघांनी सराव केला होता. या निवडीबद्दल श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, खासगी क्लास लावण्याची आर्थिक परिस्थिती नाही. सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि डी. एन. जाधव फाऊंडेशनने मोफत सुविधा दिली. अभ्यासिकेत एकांत व शांतता असते. हवी ती मासिके, वर्तमानपत्रे, पुस्तके उपलब्ध असतात. चांगले मार्गदर्शन मिळते. याचा फायदा झाला. पैसे भरूनही अशी सुविधा मिळणार नाहीत, अशा भावना या तिघांनी व्यक्त केल्या.