(डांगे पब्लिक स्कूल मध्ये चिमणभाऊ डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त एआय इनोव्हेटिव्ह स्पर्धा व प्रदर्शन)
संदिप गावडे @ प्रतिनिधी
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे. त्याचा फायदा मानव जातीच्या कल्याणासाठी व्हावा, यासाठी भविष्यात प्रयत्न झाले पाहिजेत, या तंत्रज्ञानाला हातभार लावा. असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती व किर्लोस्कर कंपनीचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पाटील यांनी केले.
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने राज्यस्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) इनोव्हेटिव्ह स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी जेष्ठ मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे (आप्पा) हे होते. तर आष्ट्याचे माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, मातोश्री श्रीमती शालन पाटील, खोची विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक सुदर्शन पाटील, पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुभाष पाटील, स्पर्धेचे परीक्षक डॉ. एस.आर.देसाई, आरआयटी रोबोटिक डिपार्टमेंटचे पृथ्वी जाधव, आरएनटी रोबोटिक्सचे डॉ. माधव साळुंखे, प्रो. माधुरी सिद्धारपु, मुख्याध्यापक महेश जाधव, ज्युनिअर विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. दिपाली देसाई, उपमुख्याध्यापक सुधीर थोरात हे यावेळी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजकुमार पाटील म्हणाले, आपला देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांनी आपले ध्येय व उद्दिष्ट ठरवून ते साध्य करण्याची जिद्द निर्माण केली पाहिजे. तर डॉ. अण्णासाहेब डांगे म्हणाले, भविष्यात एआय व रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे व जगाला मानवतेचा संदेश द्यावा. तसेच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपले ध्येय साध्य करावे.
या स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील चाळीस संघानी सहभाग नोंदवला होता. यामध्ये लहान गट (इयत्ता ५ ते ८) मध्ये प्रथम क्रमांक अण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूल इस्लामपूर, द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स आष्टा व तृतीय क्रमांक माध्यमिक आश्रम शाळा आष्टा यांनी तर माध्यमिक गट (इयत्ता ९ ते १२) मध्ये जुनेदिया इंग्लिश मीडियम स्कूल कुडची जि. बेळगाव, द्वितीय क्रमांक बळवंत कॉलेज विटा व तृतीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स आष्टा यांनी पटकावला.
यावेळी बक्षीस वितरण करताना झुंजारराव पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी भविष्यात सामाजिक बांधिलकी जपून आपले ध्येय पूर्ण करावे. तसेच मा. चिमणभाऊ डांगे यांचा वाढदिवस हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या अशा प्रकारच्या स्पर्धा व प्रदर्शनाने साजरा केला जात असल्याने त्यांनी शाळेचे व संस्थेचे कौतुकही केले.
प्राचार्य सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक करताना पब्लिक स्कूलची व संस्थेच्या विविध शाखांची माहिती दिली. यावेळी पाहुण्यांचा परिचय डॉ.दिपाली देसाई यांनी तर आभार उप मुख्याध्यापक सुधीर थोरात यांनी मानले. सूत्रसंचालन पाटील एस. एम. व सौ देसाई डी. एस. यांनी केले. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी संयोजन केले.





Social Plugin