कन्नड :- (यशवंत पवार )
कन्नड तालुक्यातील पिशोर येथील शफेपूर भागातील रहिवासी प्रियंका नितीन मोकासे (वय २४) या विवाहितेचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१० फेब्रुवारी) सकाळी नऊच्या सुमारास समोर आली.
प्रियंका रविवारी दुपारी शेतात देवदर्शनाला गेली होती. खूप वेळ होऊनही ती घरी न आल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला. तिचा शोध लागला नाही. शफेपूर शिवारातील गट क्रमांक २३९ मधील विहिरीजवळ तिच्या चपला दिसल्या. पोलीस पाटील चित्रा पवार यांनी या घटनेची माहिती पिशोर पोलिसांना दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत महिलेचा विहिरीत शोध घेतला.
मात्र ती मिळून आली नाही. सोमवारी सकाळी पुन्हा विहिरीत शोध घेतला असता सकाळी नऊला मृतदेह पाण्यावर तरंगून आला. त्यानंतर पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. पिशोर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे करत आहेत. प्रियांकाला दोन वर्षांचा मुलगा असून, आई येईल या आशेने तो रविवारी रात्रभर रडत होता. त्यानंतर सकाळी तिचा मृतदेहच मिळून आल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही आत्महत्या की अपघात याबाबत स्पष्ट नाही. पोलीस तपास करत आहेत.





Social Plugin