Ticker

6/recent/ticker-posts

सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे परिपूर्ण चरित्र निर्माण व्हावे : चंद्रकांत दळवी


     उद्योजक रामदास माने यांना सरसेनापती प्रतापराव  गुजर पुरस्कार प्रदान..         

 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 भोसरे ऐतिहासिक योगदान आणि प्रेरणा देणारे गाव आहे. भोसरेने गौरवशाली इतिहासाची परंपरा जपली आहे.  सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अतुलनीय पराक्रम गाजवत स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करले. स्वराज्य निर्मिती साठी रक्त सांडणा-या सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे परिपूर्ण चरित्र निर्माण करण्याची गरज आहे. तसेच 

नव उद्योजकांसाठी उद्योजक रामदास माने आयडियल माॅडले आहेत असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी केले. 

        भोसरे (ता खटाव) येथे सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठान यांच्या माध्यमातून सरसेनापती स्मृती दिन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी उद्योजक रामदास माने, शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील, उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर,  इतिहासकार प्रविण भोसले, सरपंच निता मदने, शिवाजीराव सर्वगोड, प्रा. सुधीर इंगळे, विकास सोसायटी चेअरमन पै. विकास जाधव, माजी पं स सभापती पै. संदीप मांडवे, हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊशेठ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

     चंद्रकांत दळवी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सरसेनापती कुडतोजी गुजर यांचा प्रताप बघून 'प्रतापराव' ही पदवी दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत प्रतापराव गुजर यांनी स्वराज्य स्थापनेत मोठे योगदान दिले. त्यामुळे भोसरे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. त्यांच्या त्यागाचे स्मरण आजही केले जाते. त्यामुळे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे परिपूर्ण चरित्र निर्माण करण्याची गरज आहे. तसेच भोसरे ग्रामस्थांनी ग्रामविकास आणि जलसंधारणाचे मोठे काम केले आहे. येथील मुले-मुली प्रशासकीय सेवेत येत आहेत. तर उद्योग क्षेत्रात यशस्वी झालेले उद्योजक रामदास माने नव उद्योजकांसाठी आयडियल माॅडले आहेत असे सांगितले. 

            सत्काराला उत्तर देताना उद्योजक रामदास माने यांनी आपला जीवनपट उलगडून दाखवला. सरसेनापती प्रतापराव गुजर हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम पुरस्कार आहे असे सांगत त्यांनी, युवा पिढी आणि मराठी माणसांनी उद्योग क्षेत्रात यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. उद्योजक होणे सोपे आहे. फक्त त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असायला पाहिजे असा गुरू मंत्र तरुणांना दिला. तर संधी घ्या आणि संधीचे सोने करा. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा असे सांगत रामदास माने यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे कार्य भावी पिढीला समजावे यासाठी भरीव योगदान देणार असल्याची ग्वाही दिली. 

              यावेळी शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील, प्रविण भोसले, प्रा सुधीर इंगळे, उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर यांनी मनोगत व्यक्त केले. 

            यावेळी प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या वैभव आबासाहेब जाधव, शैला मधुकर जाधव, दत्तात्रय मारुती देशमुख आणि तुळापूर येथून शिवज्योत आणणा-या मावळ्यांचा सन्मान करण्यात आला. 

   यावेळी सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठानचे अध्यक्ष कैलास गुजर, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष आबासो जाधव, सचिव संजय जाधव, खजिनदार शहाजी गुजर,  उपसरपंच अभिजित जाधव, माजी सरपंच नितीन पाटील, विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन अधिक जाधव, मधुकर जाधव, लहुराज दरेकर, आप्पासाहेब देशमुख, ग्रामस्थ उपस्थित होते. 

                    कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन आणि आभार तानाजीराव देशमुख यांनी मानले.