Ticker

6/recent/ticker-posts

दलित महासंघाच्या पाल ठोक आंदोलनाचा धसका, प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित



संदिप गावडे, आष्टा /प्रतिनिधी 

         आष्टा येथे दलित महासंघाच्यावतीने झोपडपट्टीतील नागरिकांना नागरी सुविधा मिळण्यासाठी आष्टा अप्पर तहसील कार्यालयासमोर दोन दिवसापासून उलटी खुर्ची तसेच पाल ठोक आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचा धसका घेत  प्रशासनाने नागरी सुविधा पुरविण्याबाबत लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनास यश आले असून  आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याची घोषणा डॉ. सुधाकर वायदंडे यांनी केली. 

        आष्टा येथील नागांव रस्त्यालगत असणाऱ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या सुमारे १०० कुटुंबांना नागरी सुविधा मिळण्याबाबत दलित महासंघाच्या वतीने जुलै २०२४ ला केलेल्या आंदोलनानंतर दि. ६ रोजी पुन्हा आष्टा अप्पर तहसील कार्यालयासमोर उलटी खुर्ची आंदोलन सुरू करण्यात आले. त्या दरम्यान झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत चर्चा निष्फळ ठरल्याने दि. ७ रोजी पाल ठोक करून आंदोलन सुरू केले. सुरुवातीला काही पाल ठोकल्यानंतर झोपडपट्टीतील इतर नागरिकही या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. आंदोलकांनी दिवसभर घोषणाबाजी करून तहसील परिसर दणानून सोडला. याचा धसका प्रशासनाने घेतला. 

         त्यामुळे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ऑफर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित पाटणकर यांची आंदोलकाबरोबर बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली. यामध्ये झोपडपट्टीतील वीज कनेक्शनसाठी महावितरणने ८ लाख ८६ हजार रुपये मंजूर केलेले आहेत. त्याची मान्यता मिळून काम सुरु होईपर्यंत गरजेनुसार तात्काळ वीज कनेक्शन देण्याचे लेखी पत्र महावितरणचे अमित पाटणकर यांनी दिले.

              त्याचबरोबर नगरपालिकेच्या वतीने झोपडपट्टीतील शौचालयाची स्वच्छता करून नविन दरवाजे बसविण्यात आले, जुन्या पाईपलाईन ची दुरुस्ती करण्यात आली, तसेच नविन पाईपलाईन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून दोन महिन्यात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे, कचरा गाडी पाठवणे, शौचालयांची वेळोवेळी साफसफाई व औषध फवारणी करणे, पाणी कमी पडत असल्यास टँकरने पाणी पुरवठा करणे, नविन फिरते शौचालयासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे लेखी पत्र नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते यांनी दिले.

         दलित महासंघ वायदंडे गटाच्या आंदोलनामुळे झोपडपट्टीतील सुविधेबाबत अनेक मागण्या मान्य होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे. तसेच काही मागण्याबाबत महावितरण व नगरपरिषदेने लेखी पत्र दिल्याने सदर पाल ठोक आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे दलित महासंघाचे राज्यअध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांनी सांगितले.           

         यावेळी दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड, प.महा कार्याध्यक्ष सदाभाऊ चांदणे, युवक आघाडी प. महा अध्यक्ष सुनिल मोरे सर, कामगार आघाडी प. महा अध्यक्ष संभाजी मस्के, वाळवा ता.अध्यक्ष नारायण वायदंडे, आष्टा शहर अध्यक्ष राजेंद्र घस्ते, आष्टा शहर उपाध्यक्ष अमोल लोखंडे, भटक्या जाती जमाती आघाडीचे गुलाब सय्यद, राजेंद्र वायदंडे, संदीप अवघडे, तुळशीराम बागडी, पप्पण बागडी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच पुरुष व महिला नागरिक उपस्थित होते.