Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा येथे एक दिवशीय आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण संपन्न



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

कारंजा येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम व तहसील कार्यालय, कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर, वीज, आग, भूकंप, रस्ते अपघात व उष्णलाट यासारख्या आपत्ती व्यवस्थापनावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार कुणाल झालटे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. साळुंखे, निवासी नायब तहसीलदार वाडेकर, निवडणूक नायब तहसीलदार बनसोडे आणि ग्रामीण पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील चव्हाण उपस्थित होते.

प्रशिक्षण दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा उपाध्ये, नगर परिषद अग्निशमन अधिकारी श्री. बाथम, पर्यावरण व पाणलोट विकास तज्ञ पवन मिश्रा आणि स्वयंसेवी संस्थेचे श्याम सवाई यांनी उपस्थितांना विविध आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात चर्चिलेले महत्त्वाचे विषयः पूर व्यवस्थापन वीजसंबंधी आपत्ती नियंत्रण आगीच्या घटना व त्यावरील उपाययोजना भूकंप व त्यावरील सुरक्षात्मक उपाय रस्ते अपघात प्रतिबंध व त्वरित मदत उष्णलाट प्रतिबंधक उपाय वातावरणीय बदलांचे संभाव्य परिणाम तालुका स्तरावरील अधिकारी, सरपंच, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, शिक्षक, पोलिस कर्मचारी, आरोग्य सेवक/सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कोतवाल, रोजगार सेवक आणि विविध शासकीय विभागांचे कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तलाठी राहुल वरघट यांनी केले. तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.