कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
जालना: शहरानजीकच्या ग्रामीण भागात असलेल्या इंदेवाडी येथील एका भोंदूबाबाने जादूटोणा, मंत्रतंत्र करून नोटांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने चार शेतकऱ्यांना लाखो रुपयांना फसवल्याची तक्रार जालना तालुका पोलीस ठाण्यात मागील आठवड्यात नोंद झाल्याचे महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांना समजले. जादूटोणा, मंत्रतंत्र करून पैशाचा पाऊस पडतो, ह्या अंधश्रद्धेला बळी पडलेल्या चार शेतकऱ्यांनी सदर भोंदू बाबाला काही लाख रुपयांची रक्कम रोख दिली आणि काही रक्कम फोन पे ने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
भोंदूबाबाने जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडलाही. वर्षावातून प्राप्त नोटा एका गोणीत जमा केल्या. लाभार्थी ही नोटांची गोणी घेऊन जात असताना, भोंदूबाबाने जादूटोणा करून ह्या शेतकऱ्यांसमोर भूत उभे केले . या गडबडीत भोंदूबाबा नोटांच्या गोणीसह गायब झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.खरंतर जगात भूत नाहीच. तसेच जादूटोणा, मंत्रतंत्र करून कुठलाही चमत्कार घडत नाही,घडवता येत नाही. चमत्कार करून दाखवतो, असे म्हणणे किंवा तसा दावा करणे, ही बाबच मुळी वैज्ञानिक दृष्टिकोन या राज्य घटनेतील मूल्याशी विसंगत आहे .
म्हणून चमत्काराचा दावा करणाऱ्या कोणीही व्यक्तीने आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर चमत्कार सदृश्य गोष्टी सिद्ध करून दाखवाव्यात तसेच भुताचा प्रत्यक्ष फोटो काढून दाखवावा. अशा व्यक्तीला महाराष्ट्र अंनिसच्या वतीने पंचवीस लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल, असे जाहीर आव्हान महाराष्ट्र अंनिसने अगदी सुरुवातीपासूनच दिलेले आहे.
मात्र संघटनेच्या मागील ३५ वर्षात हे जाहीर आव्हान स्वीकारायला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातूनही एकही तांत्रिकमांत्रिक, भोंदूबाबा पुढे आलेला नाही, म्हणून पोलिस अधीक्षक यांनी आपल्या पोलिस यंत्रणेमार्फत या भोंदूबाबाचा व त्याच्या साथीदारांचा तातडीने शोध घ्यावा. त्यांची सखोल चौकशी करावी. त्यांनी यापूर्वी अशा प्रकारे अंधश्रद्धेच्या माध्यमातून किती लोकांची कशा कशाप्रकारे फसवणूक व शोषण केले ,हे उजेडात आणावे. कदाचित हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. जादूटोणाविरोधी कायदा तसेच इतर आवश्यक कायद्यान्वये ह्या भोंदू बाबा विरोधात व त्याच्या साथीदारांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी. म्हणजे भीती , लोभ, लालसा,हव्यास यापोटी लोक अंधश्रद्धेला बळी पडणार नाहीत, असे निवेदनात नमूद आहे.
निवेदनावर महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे, जालना जिल्हा अध्यक्ष वैशाली सरदार, जिल्हा कार्याध्यक्ष राजू खिलारे ,जिल्हा प्रधान सचिव दिलीप शिखरे, आणि ऍड. मारोती वाडेकर यांनी स्वाक्षरी करून निवेदन सादर केले.





Social Plugin