Ticker

6/recent/ticker-posts

श्री क्षेत्र येडोबा देवाची यात्रा गुलाल खोबऱ्याची उधळण करत लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरी



पाटण, (दिनकर वाईकर)

 येडोबाच्या नावानं चांगभलं', नाईकबाच्या नावानं चांगभलं, "जोगेश्वरीच्या नावानं चांगभलं' च्या गजरात, ढोल, ताशांच्या गजरात, गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र येराडच्या येडोबा देवाचा मुख्य मोठा छबिना सोमवार  दि. 14 एप्रिल  रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या छबिन्यात जवळपास 35 गावातील मानाच्या सासनकाठ्यांचा सहभाग होता. छबिन्याप्रसंगी गुलालाच्या उधळणीमुळे संपूर्ण मंदीर परिसरात गुलालाचा  सडा पसरलेला होता.

    दरम्यान सूर्य आग ओकत असतानाही भर उन्हातही भाविकभक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता. अगदी लहान मुलांपासून ते महिला वअबाल वृद्धांपर्यंत सर्वचजण छबिन्यात सहभागी झाले होते.

          पाटण तालुक्यातील श्री क्षेत्र येराड (बनपेठ) येथील निसर्गरम्य आमराईच्या वनात कोयना नदीतीरावर वसलेले येराड येथील श्री येडोबा देव  हे एक  जागृत देवस्थान आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत येडोबा देवाची यात्रा शनिवार , रविवार  व सोमवार  या दिवशी उत्साहात पार पडली. शनिवारी  देवास तेल व धुप चढविण्यात आले.तर हनुमान जयंती व  पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणेच रविवारी दि, 13  दुपारी 1 वाजून 25मि, दरम्यान  वाजता लहान छबिना आणि सोमवारी  दि. 14 रोजी दुपारी   मोठा छबिना काढण्यात आला. या छबिन्याच्या सुरूवातीला येराड, नाटोशी, धावडे, सुरूल, नेरळे, गुंजाळी, काळमवाडी, वाटेगाव, पेठ, नेर्ले आंदी गावच्या मानाच्या पालख्या व सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी धारविधी, ढोलकरी, तरुण हातात मडकी घेऊन छबिन्यात सहभागी झाले होते. नाईकबा मंदिराजवळ छबिना येताच उपस्थितीत लाखो भाविकांनी गुलालाची उधळण जल्लोषात  केली. 

   मंदिर परिसरात   सर्वत्र येडोबाच्या नावाचा जयघोष ऐकावयास मिळत होता. छबिन्यात युवकांचा सहभाग मोठा होता.यात्रा कमिटी, ग्रामस्थ, महसूल विभाग व पाटण पोलीस स्टेशन यांच्याकडून यात्रेचे चोख नियोजन करण्यात आले होते. मंदिरापासून ठराविक अंतरावर दुकानांची रेलचेल ठेवण्यात आली होती. लाखो भाविकभक्तांची उपस्थिती लक्षात येता मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविकभक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची पूर्णत: दक्षता घेण्यात आली होती.यात्राकाळात . रांगेतून दर्शन घेण्यासाठी भाविकांना सोडण्यात येत होते त्यामुळे व्यवस्थितपणे दर्शन घेता आले.  ठिकठिकाणाहून ज्यादा एसटी बससे सोडण्यात आल्या होता. येराड येथील श्री येडोबा देवाच्या  यात्रेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पुणे, मुंबईसह कोकणातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी भाविक भक्तानी  येडोबा देवाचे दर्शन घेतले.

   

सोमवारी  रात्री 12 वाजता रिंगवण हा धार्मिक विधी पार पडला . यात्रा यशस्वीपणे व शांततेत पार पाडण्यासाठी देवस्थान कमिटी व यात्रा नियोजन कमिटीचे अध्यक्ष, येराडचे सरपंच, बनपेठचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्यासह येराड (बनपेठवाडी)  , गावातील देवाचे मानकरी  ग्रामस्थ,तरुण वर्ग  प्रतिष्ठीत नागरीक व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.