Ticker

6/recent/ticker-posts

पाटण नगरपंचायत उप नगराध्यक्ष पदासाठी सचिन कुंभार बिनविरोध.



पाटण  ( दिनकर वाईकर  ) 

पाटण नगरपंचायत उप नगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटाचे सचिन कुंभार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

    पाटण नगरपंचायत उप नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. शुक्रवारी यासाठी पाटणकर गटाकडून सचिन कुंभार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाटणचे उप विभागीय अधिकारी सोपान टोम्पे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष मोरे यांनी काम पाहिले.

    या निवडीनंतर बोलताना सचिन कुंभार म्हणाले, आमचे नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला उप नगराध्यक्ष पदाची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पाटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निश्चितच प्रामाणिक व सचोटीने प्रयत्न करणार आहे. यासाठी मला पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

      या निवडीनंतर सचिन कुंभार यांचे विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, युवा उद्योजक याज्ञसेन पाटणकर, पाटण अर्बन बँक चेअरमन बाळासाहेब राजे महाडिक, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, विक्रमसिंह पाटणकर दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेश पवार, माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, पाटण नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. अनिता देवकांत आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी अभिनंदन केले.