Ticker

6/recent/ticker-posts

डिस्कळ येथे शेततळ्यातून तब्बल सुमारे १२०० माशांची चोरी



हजारों रुपयांच्या नुकसानीने तरुण निराश. नव्याने व्यवसायात उतरलेल्या युवकाची उमेद हरतेय ! पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.


बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

डिस्कळ ता खटाव येथील शौर्य अँकॅडमी लगत असलेल्या  कंबळज नावाच्या शेत शिवारातील सुनील तानाजी ठोंबरे या युवा शेतकऱ्याच्या शेततळ्यातून सुमारे बाराशे मासे चोरीला गेले आहेत.झालेल्या प्रचंड नुकसानामुळे सदर युवक हताश झाला आहे.या बाबत डिस्कळ चे पोलिस पाटील यांना कल्पना देण्यात आली आहे.

घटनास्थळवरून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील ठोंबरे हे पनवेल येथे बजाज फायनान्स कंपनीचे रिकव्हरी अधिकारी म्हणून काम पाहत होते. दरम्यान कोरोना काळात गावी आल्याने मुंबईपेक्षा गावाकडे काहीतरी व्यवसाय करावा या उद्देशाने त्यांनी कुठलेही शासकीय अनुदान न घेता स्वखर्चाने सुमारे ४ लाख रुपयांचे शेततळे काढले. स्वतःच्याच पाण्याची सोय त्यांनी केली.त्यात मत्स्यपालन,उत्पादन आणि विक्री व्यवसाय सुरु केला होता. सुरुवातीला अनुभव नसल्याने थोडाफार तोटा सहन करावा लागला.मात्र गेल्या दोन वर्षांपासून व्यवसायात चांगला जम बसवण्यात सदर युवक यशस्वी ठरला होता. डिस्कळ तसेच परिसरात गावोगावी फिरून तर कधी रस्त्याकडेला बसून सुनील ठोंबरे यांचे कुटुंब माशांची सुमारे दीडशे रूपये किलो प्रमाणे विक्री करत होते.चालू वर्षी तर माशांची उत्तम वाढ झाल्याने तसेच ओढे, नदी पेक्षा शेततळ्यातील माशांना उत्तम चव असल्याने इतरांच्या पेक्षा किलोला ५०रुपये अधिक भाव त्याच्या माशांना मिळत होता. महिन्याभरात सुमारे १००किलो मालाची त्यांची विक्री होत होती.

               मात्र काही विघ्नसंतोषी लोकांना हे पाहवत नसल्याने नव्याने व्यवसायात उतरलेल्या युवकाची उमेद हरुन गेली आहे. याचे कारण म्हणजे मंगळवार दिनांक ८ रोजी या कुटुंबाने तळ्यातील मासे काढले,त्यासाठी लागणारी जाळी व इतर साहित्य शेततळ्याजवळ ठेवले होते.त्या दिवशी मालाची विक्रीही केली. दुसऱ्या दिवशी माल काढण्यासाठी सुनील आपल्या आई सोबत शेततळ्यात गेले असता मासे काढण्याची जाळी सापडेना. माशांची संख्या ही म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात पाण्यात तरंगताना दिसेना. कदाचीत तळ्याच्या खालील भागात असतील म्हणून त्यांनी मासे वर येण्याच्या दृष्टीने प्रयत्न ही केले.मात्र ज्या तळ्यात सुरुवातीला ३हजार बीज सोडले, त्यापैकी किमान २ हजार जगले, वाढले असतील. आत्तापर्यंत सुमारे १००किलो माल विकला आणि शेततळ्यात तर फक्त २०० ते ३०० मासेच दिसून आल्याने आपल्या माशांची चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले.


मुंबई सारख्या ठिकाणी १५ ,२० हजारांच्या नोकरी पेक्षा गावात एखादा व्यवसाय करून, स्वप्न पाहून ते यशस्वी करायची! मात्र चोरट्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढायच्या, त्यामुळे नव्याने एखाद्या व्यवसायात उतरलेल्या युवकाची उमेद हरुन जात आहे.एखादी गोष्ट करावी का नकोच? अशी अवस्था युवकांची होत आहे. लाखों रुपयांचे नुकसान कसे भरून काढायचे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने या बाबत तात्काळ कारवाई करावी. -सुनील तानाजी ठोंबरे  डिस्कळ ता खटाव