Ticker

6/recent/ticker-posts

तलवाड्यात भिमज्योती जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन!



हजारोच्या संख्येने उपस्थित रहा- सुमेध करडे

तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई 

गेवराई (बीड):- ता/१३ गेवराई तालुक्यातील तलवाडा  येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भिमज्योती जयंती महोत्सव २०२५ भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. भिमज्योती जयंती उत्सव समिती, तलवाडा यांच्या वतीने विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सामाजिक परिवर्तनाचा संदेश या महोत्सवाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

१३ एप्रिल रोजी रात्री ८ ते १० या वेळेत भव्य भिमज्योती मिरवणूक व शांतता रॅली काढण्यात येणार असून सर्व समाज बांधवांनी हजारो चे संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुमेध करडे तसेच संयोजन समितीचे वतीने करण्यात आले आहे  मिरवणुकीचे उद्घाटन तलवाडा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी सोमनाथ नरके यांच्या हस्ते होईल.

१४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सकाळी १० वाजता ध्वजारोहण व अभिवादन सभा जुने बसस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर होणार आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह पंडीत उपस्थित राहतील. तसेच गेवराई तालुक्याचे नूतन आमदार विजयसिंह पंडित यांचा समाजबांधवांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता विद्यार्थी स्नेहसंमेलन आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर विशेष चित्रफीत दाखवली जाणार आहे.

२३ एप्रिल रोजी महाविहार धम्मभूमी, शिवणी येथील पूज्य भिक्खू धम्मशील थेरो यांची धम्मदेशना आयोजित करण्यात आली आहे.

२४ एप्रिल रोजी महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध रॉक स्टार संतोष जोंधळे यांच्या बहारदार भीमगीतांचा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री बदामराव पंडीत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे असतील. तसेच बीडचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत विशेष उपस्थित राहणार आहेत.

२५ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता लेझर शो आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्रफित दाखवण्यात येणार आहे.

संपूर्ण महोत्सव समाजजागृती, परिवर्तन आणि प्रेरणादायी विचारांचा जागर घडवणारा ठरणार आहे. भिमज्योती जयंती उत्सव समितीने सर्व नागरिकांना या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुमेध करडे तसेच संयोजन समितीचे वतीने करण्यात आले आहे