( पालकमंत्री संजय राठोड व खासदार संजय देशमुख या दाम्पत्याच्या उपस्थितीत अभिषेक )
राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : आर्णी रोडवरील दिग्रस पासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावरील प्राचीन व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या तुपटाकळी या गावात श्रीराम मंदिर संस्थांनची भव्य व अप्रतिम नक्षीकाम असलेली वास्तू आजही कित्येक वर्षापासून उभी आहे या श्रीराम नवमी सह विविध धार्मिक उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरे करतात. प्रसंगी साधुसंत आणि भक्त मंडळीची उपस्थिती प्रामुख्याने यावेळी असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव निमित्त होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रा चे अभिषेकासाठी यजमान म्हणून आज 6 एप्रिल रविवार रोजी सकाळी 9 वाजता मृद्ध व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजयभाऊ राठोड व सौ शितलताई संजय राठोड, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजयभाऊ देशमुख व वैशाली ताई संजय देशमुख या दाम्पत्याची अभिषेकला उपस्थिती लाभली.सध्याचे मंदिर १९२० दरम्यान पूर्ण बांधकाम झाल्याचा उल्लेख आढळतो ४० बाय ८० चा लाकडी नक्षीदार खांबांचे दुमजली भव्य सभामंडप असून त्यावर टीन पत्रे आहेत. गाभाऱ्यावर शिखराचे टोकापर्यंत पोकळी असून संपूर्ण बांधकाम दगडी आहे. आजही जुना लाकडी नक्षीदार रेखीव असा मोठा रथ आहे. यात पितळी मूर्ती, रामाच्या मूर्ती ठेवून उत्सवा दरम्यान दररोज गाव परिक्रमा केली जाते.
पूर्वी येथे चैत्र पाडवा ते रामनवमी दरम्यान भव्य यात्रा सुद्धा भरत होती कालांतराने ती लुप्त झाली. रामनवमी जन्मोत्सवाच्या वेळी बारूद फुटण्याची प्रथा होती. यासाठी येथील उत्सव प्रसिद्ध असल्याचा उल्लेख जुन्या पाठ्यपुस्तकात होता. १९२० मध्ये प्लेग मरगडीची साथ तसेच यापूर्वी १८ महिन्यांचा मोठा दुष्काळ या दोन संकटातून हे गाव वाचले म्हणून रामजी पाटील उपरती होऊन काशी ला गेले. तेथील परिसर फिरताना त्यांना रामाच्या मुर्त्या दिसल्या. आपल्या घरी रामविजय वाचले जाते म्हणून त्यांनी मूर्ती विकत घेतल्या तद्नंतर याच मुर्त्या जुन्या मुर्त्या भंग पावल्याने स्थापन करण्यात आल्या असा उल्लेख आढळतो.रामनवमी उत्सवाची व्यवस्था तसेच प्रवचनकार यांचे रक्षण करते म्हणून व्यवस्था पाहणारे भालदार चोपदार यांच्या आजही असलेल्या बिल्ल्यावर श्रीराम मंदिर संस्थान तूपटाकळी स्वयंसेवक संघ १८९१ असा उल्लेख आढळतो.१२० वर्षाची हरिपाठाची परंपरा आजही या श्रीराम मंदिर मंदिरात सुरू आहे. गावात गटा-तटाचे राजकारण असूनही उत्सवादरम्यान सर्व लहान थोर मंडळी एकत्र येऊन रामनवमी उत्सव ९ दिवस साजरा करतात व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होते. दररोज सायंकाळी हरिपाठ प्रत्येक एकादशीला भजन, कीर्तन, कार्तिक महिन्यात काकड आरती व हनुमान जयंती यांसारखे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. पूर्वी येथील उत्सवादरम्यान तूप पुरणपोळीच्या पंगती होत त्यावेळी इतके तूप वाढले जायचे की या टाकळी गावाला तूपटाकळी हे नाव पडले असावे असे जाणकार सांगतात. अनेक धर्म दात्यांनी या मंदिर उत्सव खर्चापोटी शेत जमिनी तर रामजी सदोबा पाटील यांनी आपली आयुष्यभराची पुंजी दिली आहे. आज मंदिरात विराजमान असलेल्या श्रीराम-लक्ष्मण-सीता व हनुमान यांच्या मुर्त्या फारच विलोभनीय अशा आहेत. धार्मिक वातावरणात समरस होणारे टाकळी हे गाव उल्लेखनीय असून येथे भाविकांनी या प्राचीन मंदीराला एक वेळ अवश्य भेट द्यावी आणि दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.





Social Plugin