Ticker

6/recent/ticker-posts

हल्ल्यातील जखमींना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल

 


बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]  

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात मंगळवार, 22 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास गोळीबार झाला. पर्यटकांवर झालेला हा हल्ला दहशतवादी हल्ला असून यात खटाव तालुक्यातील बुध येथील उदयोजक संतोष जगदाळे  [वय  ५४ ]या  पर्यटकांचा मृत्यू झाला आहे .

 हल्ल्यातील जखमींना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर रुग्णांना श्रीनगरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरला रवाना झाले आहेत. जखमींमध्ये बुध येथील रहिवाशी व  पुण्यातील जगदाळे कुटुंब देखील आहे. याच कुटुंबातील आसावरी जगदाळे हिने या हल्ल्याचा आँखो देखा हाल  सांगितला. आसावरी या मनुष्यबळ विकास संसाधन क्षेत्रात कार्यरत आहेत .

ती म्हणाली, मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेताब व्हॅलीमध्ये आम्ही फिरायला गेलो होतो. तिकडे घोड्यांवरून जावे लागते. दुपारी आम्ही तिकडे जायला निघालेलो असताना वाटेतच दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांना आमच्या डोळ्यासमोर गोळ्या घातल्या. माझ्या बाबांचे मित्रही आमच्यासोबत होते. त्यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. दोघेही गंभीर जखमी आहेत. त्यांना श्रीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर  मी, आई आणि काकू यांची व्यवस्था लष्कराच्या क्लब हाऊसमध्ये करण्यात आल्याचे घाबरलेल्या आसावरीने सांगितले.

 आसावरी जगदाळे, तिची आई प्रगती जगदाळे आणि वडील संतोष जगदाळे हे त्यांचे मित्र कौस्तुभ गनबोटे आणि त्यांची पत्नी संगीता गनबोटे यांच्यासह पहलगाम येथे फिरायला गेले होते. आसावरी म्हणते, "बेताब व्हॅली म्हणून पर्यटन स्थळ आहे. तिथे मिनी स्वित्झर्लंड नावाची जागा आहे, मोकळं पठार आहे. जिकडून स्वित्झर्लंडसारखे बर्फानी भरलेले डोंगर दिसतात. तेथील स्थानिक पोशाख करून तिथे फोटो काढले जातात. तिथे पर्यटकांची गर्दी असते. तिकडेच आम्ही घोड्यावरून गेलो होतो. तिकडे शेकडो पर्यटक होते. अचानक गोळीबार झाला. पोलिसांच्या वेशातच काही दहशतवादी बाजूच्या टेकड्यांवरून उतरताना दिसले. त्यामुळे आम्ही ताबडतोब जवळच्या तंबूंमध्ये आसरा घेण्यासाठी गेलो. तिथे आधीपासूनच आमच्यासारखे 6 ते 7 पर्यटक लपून बसले होते. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये हा गोळीबार सुरू असेल असं समजून त्यापासून बचाव करण्यासाठी आम्ही जमिनीवर आडवे झालो.

मात्र, ते दहशतवादी तंबूजवळ आले आणि तिथे गोळीबार केला. त्यानंतर ते आमच्या तंबूपाशी आले आणि त्यांनी माझ्या बाबांना बाहेर बोलावल्याचे आसावरीने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी ते भारतीयांना बोललावत होते. तसेच आम्ही निष्पाप लोक, महिला आणि मुलांना काही करत नसल्याचे सांगत आमची बदनामी केली जात असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी वडिलांना अजान म्हणायला लावली. पण ते म्हणू न शकल्याने त्यांनी बाबांना 3 गोळ्या घातल्या. एक डोक्यात, एक कानाच्या मागे आणि एक पाठीत, अशी माहिती आसावरीने दिली. माझे काका देखील माझ्या बाजूला होते. दहशतवाद्यांनी त्यांना देखील 4 - 5 गोळ्या घातल्या.

यासोबतच त्यांनी तिथे असलेल्या अनेक पुरुषांना गोळ्या घातल्या आणि तिथे मदतीसाठी कोणीही नव्हते. पोलिसही नाहीत आणि लष्करही. पहिली मदत पोहोचली ती 20 मिनिटांनी आली. हल्ला झाल्यानंतर आम्हाला नातेवाईकांच्या तब्येतीसंदर्भात कोणतेच अपडेट मिळत नाहीयेत", असे चिंतेच्या सुरातच आसावरी म्हणाली.

 ज्या व्यक्ती आम्हाला तेथे घेऊन गेल्या त्यांनी आम्हाला परतण्यास मदत केली. आमची वैद्याकीय तपासणी करण्यात आली. आम्हाला पहेलगाम क्लब येथे हलविण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता हल्ला झाला. मात्र पाच तासांनंतर माझे वडील किंवा काकांबद्दल काहीही माहिती देण्यात आली नाही, असे आसावरी यांनी सांगितले.