ऐन उन्हाळ्यात येरळेला पाणी सोडले
बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
पाणी म्हणजे जीवन! ऐन उन्हाळ्यात येरळा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पुसेगाव, काटकरवाडी, खातगुण, खटाव भागातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून पाण्याचे पूजनही करण्यात आले.कायम दुष्काळी असलेल्या खटाव तालुक्याची ओळख आता संपुष्टात आली आहे. तालुक्याचा तारणहार असलेला ब्रिटिशकालीन नेर तलाव लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या (जिहे कठापूर योजना) पाण्याने गच्च आणि लाइफलाइन असलेली येरळा नदी भर उन्हाळ्यातही खळखळून वाहत आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
पुसेगाव, काटकरवाडी, खातगुण, खटाव या ग्रामपंचायतींच्या वतीने तसेच भागातील शेतकरी वर्गातून येरळा नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी येरळा नदी पुन्हा एकदा वाहती केली. त्यामुळे
सध्या शेतात असलेल्या उन्हाळी भुईमूग, ऊस, कांदा तसेच जनावरांच्या चाऱ्याची प्रश्न सुटला व इतर पिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच गावागावच्या ग्रामपंचायत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी नदीपात्रात असल्याने भागातील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. पुसेगावच्या श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन रणधीर जाधव, संतोष जाधव, संतोष वाघ, माजी विश्वस्त विजय जाधव, सरपंच घनशाम मसणे, उपसरपंच विशाल जाधव, अंकुशराव पाटील, प्रवीण जाधव, बाबू जाधव, प्रदीप जाधव व ग्रामस्थ यांनी वाहत्या येरळामाईच्या पाण्याची पूजा केली. छायाचित्र .पुसेगाव : येरळा नदीच्या पाण्याचे पूजन करताना रणधीर जाधव, संतोष जाधव, संतोष बाघ, विजय जाधव, घनशाम मसणे, विशाल जाधव, अंकुशराव पाटील, प्रवीण जाधव, बाबू जाधव, प्रदीप जाधव व इतर. छाया - प्रकाश राजेघाटगे





Social Plugin