देगलूर – भारतीय संविधानाचे शिल्पकार, समतेचे पुजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येरगी ग्रामपंचायतीत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने डास बाबासाहेब आंबंडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी सरपंच संतोष पाटील यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांची आजच्या काळात गरज अधोरेखित करताना सांगितले की, केवळ प्रतिमा पूजन पुरेसे नाही, तर विचारांचा अंगीकार ही खरी अभिवादनाची कृती आहे.
अभिवादनानंतर स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला. घरोघरी डस्टबिन वाटप या उपक्रमाची सुरुवात आज जयंतीच्या निमित्ताने करण्यात आली असून, लवकरच येरगीतील सर्व 550 घरांमध्ये डस्टबिन वाटप पूर्ण केले जाणार असल्याचे सरपंचांनी घोषित केले. स्मार्ट व्हिलेज दिशेने येरगीची वाटचाल सुरू झाली आहे. या उपक्रमात ग्रामपंचायतीसोबतच बालिका पंचायत राजच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी घरोघरी जाऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व नागरिकांना डस्टबिनचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला, ग्रामस्थ आणि युवकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने येरगी गाव लवकरच एक आदर्श, स्वच्छ व हरित गाव म्हणून उभे राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





Social Plugin