रसिक प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पुसेगाव प्राथमिक शाळा नं.१ चा अफलातून कार्यक्रम
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कलावंतांनी थक्क करणारे कलाविष्कार सादर केले. उत्कृष्ट सादरीकरणासाठी तरुणाईमध्ये जणू ऊर्जा संचारली होती. औचित्य होते जि.प. प्राथमिक शाळा पुसेगाव नं. १ चा शुक्रवारी (दि. ११) झालेला सांस्कृतिक कार्यक्रम. विद्यार्थ्यांनी श्री ज्योतिबा बगाड, पंढरीची वारी, महाराष्ट्राची लोकधारा यासह विविध नृत्य व गीतांचे हुबेहूब सादरीकरण करून प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.
कलाविष्काराचा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कलाविष्काराचे कार्यक्रम पार पडू लागले आहेत. परंतु पुसेगाव शाळेने कलाविष्काराचा केलेला कार्यक्रमाला एक आगळवेगळी उंची दिसून आली. इ. चौथी "अ" च्या विद्यार्थ्यांनी मोरया मोरया "गणपती बाप्पा" मोरया या गीताने गणरायाला वंदन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.एखाद्या चित्रपट व टीव्हीतील नृत्याला लाजवेल असे विद्यार्थ्यांनी या गीताचे सादरीकरण केले. यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले.
इ. इ. ४ च्या विद्यार्थ्यांनी चांगभलं रं देवा चांगभलं रं ज्योतिबाच्या नावानं चांगभलं रं या गीता करिता प्रत्यक्षात बगाडाची प्रतिकृती साकारण्यासाठी बैलगाडीचा वापर करत गाण्याचे सादरीकरण केले. या बगाडाचा मानकरी साईराज बनसोडे विद्यार्थी ठरला. ज्योतिबाचं बगाड हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. इ. २ तील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा असलेल्या सुंदर माझे जाते ग, वासुदेव आला हो वासुदेव आला या गीतावर पारंपारिक पद्धतीचे पोशाख परिधान करून सादरीकरण केले. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गीतावर इ. ३ च्या विद्यार्थिनींनी नववार काष्टा साडी, डोक्यावर तुळस तर विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पोशाख व गळ्यामध्ये टाळ, मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली व पांडुरंगाचा जयघोष केला. इ. ४ च्या विद्यार्थिनींनी वेलवेटच्या आकर्षक काष्टा साड्या नेसून हुबेहूब मंगळागौर साजरी केली. व बाई पण भारी देवा गीतावर महिला प्रेक्षकांना अक्षरशा ठेका धरायला भाग पाडले. मदन मंजिरी सुरत देखणी या लावणीवर इ.४ च्या विद्यार्थिनींनी सादरीकरण केले. रिल रिमिक्स गुलाबी शरारा, पुष्पराज अंगारो अंबरसा लगता है मेरा सामे..., गोलमाल हॉरर, रेन, फनी डान्स, गोवा थीम, शेतकरी गीत, बॉलीवूड मिक्स, लोकनृत्य, लावणी व लोककलेमध्ये एक से बढकर एक नेत्रदीपक नृत्य-गीतांमुळे या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली.
विद्यार्थी कलाकरांनी आपल्या दिलखेचक अदाकारीने गीत व नृत्य सादर केले. रसिक प्रेक्षकांनी गीतांच्या तालावर ठेका धरुन विद्यार्थ्यांना दाद दिली. आकर्षक पेहराव व उत्कृष्ट मेकअपमुळे कार्यक्रमामध्ये अधिकची जान आली. विद्यार्थी कलाकारांनी केलेले पोशाख वाखण्याजोगे होते.
पुसेगाव जिल्हा परिषद शाळेतील वार्षिक कलाविष्कार कार्यक्रमाचा तीन तासाचा काळ विद्यार्थी, रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय असाच होता. जि. प. शाळेचे पटांगण गर्दीने फुलून गेले होते. या कलाविष्कार कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून असेच कलाविष्काराचे दर्जेदार कार्यक्रम होत राहो. म्हणजे यातून भविष्यात चांगले कलाकार घडतील. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल देवकर, सर्व सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण, शिक्षक ब्रह्मदेव ननावरे, उपशिक्षिका भारती पोळ, स्नेहा पवार, मिनाक्षी खोत, माधुरी तोडकर, कोरिओग्राफर व्यंकटेश कांबळे, महिला पालक यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमासाठी भाजपच्या कार्यकारणी सदस्य डॉ. प्रियाताई शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन बाळासाहेब जाधव, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते व इतर मान्यवर उपस्थित होते.
छावाच्या शाडो ॲक्टमुळे रसिकांना अश्रू अनावर
छावा चित्रपटातील शंभूराजांच्या जीवनाशी निगडित असणारा शेवटचा हृदय द्रावक प्रसंग इयत्ता चौथी "अ" च्या विद्यार्थ्यांनी शाडो ॲक्टच्या माध्यमातून सादर केला. या भावनिक ॲक्टमुळे रसिक प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले. या अप्रतिम सादरीकरणाची पुसेगावमध्ये जोरदार चर्चा आहे.






Social Plugin