बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा या समूह विद्यापीठाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटिज मार्केट्स (NISM), मुंबई या सेबीद्वारे स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेसोबत विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा करार विद्यापीठाच्या घटक महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः शेअर बाजार, गुंतवणूक सल्ला सेवा, रोखे बाजार, वित्त व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आला आहे. या अंतर्गत NISM द्वारे प्रमाणित कोर्सेस विद्यापीठाच्या तिन्ही घटक महाविद्यालयांमध्ये राबवले जाणार असून, विद्यार्थ्यांना शेअर बाजार व वित्तीय क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
NISM ही देशातील प्रमुख वित्तीय शिक्षण संस्था असून, फायनान्शियल मार्केट्स, म्युच्युअल फंड्स, डिपॉझिटरी ऑपरेशन्स, मर्चंट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरी, कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट, कर व्यवस्था, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अशा वित्तीय क्षेत्रातील आवश्यक कौशल्यांसाठी विविध अभ्यासक्रम राबवत आहे. या अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र बँका, विमा कंपन्या, गुंतवणूक क्षेत्र आणि वित्तीय संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच, गुंतवणूक सल्लागार, पोर्टफोलिओ व्यवस्थापक, रिटायरमेंट प्लॅनिंग सल्लागार यांसारख्या स्वयंरोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक वित्तीय सेवा, तांत्रिक नवकल्पना, स्टार्टअप संधी, गुंतवणूक धोरणे आणि व्यवस्थापन यासंदर्भात प्रशिक्षित करण्यासाठी हा सामंजस्य करार उपयुक्त ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगाच्या मागणीनुसार कौशल्य विकसित करता येईल आणि त्यांना भविष्यात उत्तम रोजगार किंवा उद्योजकता साधता येईल. या सामंजस्य करारामुळे सातारा आणि परिसरातील विद्यार्थ्यांना आता हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम साताऱ्यातच पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना NISM तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन दिले जाणार असून, वित्तीय बाजारातील अद्ययावत ज्ञान व कौशल्य मिळवण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी दिली.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह विद्यापीठ असून, त्याच्या कार्यक्षेत्रातील घटक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना वित्तीय क्षेत्रातील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत आहे. या दृष्टीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या शिक्षण व प्रशिक्षण संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्याचे धोरण विद्यापीठाने स्वीकारले आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन, साहचर्य व पदयोजना मंडळाचे संचालक डॉ. जयकुमार चव्हाण यांनी दिली. सध्याच्या युगात वित्तीय क्षेत्र प्रचंड वेगाने विस्तारत आहे. तंत्रज्ञानाच्या सतत होणाऱ्या प्रगतीमुळे बँकिंग, विमा, गुंतवणूक, वित्तीय तंत्रज्ञान (FinTech) यासारख्या क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध होत आहेत. डिजिटल व्यवहार, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, बिग डेटा अॅनालिटिक्स यांसारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे कुशल आणि तांत्रिक ज्ञान असलेल्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत आहेत. मात्र, या क्षेत्रातील संधींबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्याप पुरेशी माहिती नाही. तसेच, त्यांच्यात आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची गरज आहे. यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित विद्यापीठाने आणि वित्तीय संस्थांनी एकत्र येऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वित्तीय क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या मान्यतेनुसार, हे अभ्यासक्रम जून २०२५ पासून सुरू होणार असल्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार यांनी सांगितले.





Social Plugin